आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Not Want Alliance With BJP, Samantar Project Will Complete

भाजपची युतीची इच्छाच नाही? समांतर पूर्ण करण्याची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार की नाही होणार याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष असले तरी युतीची शक्यता आता मावळत चालली आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य जाहीरनाम्यात समांतर जलवाहिनीचे कसे वाटोळे झाले, हा मुद्दा कळीचा करण्यात आला आहे. त्यामुळे आपोआपच शिवसेना टार्गेट होणार असल्याने भाजपकडून युतीसाठी बोलणीच्या फे-यांना उपस्थिती दर्शवण्यात येत असली तरी युती करण्याची इच्छा नसल्याचे यावरून स्पष्ट होते.

भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या जाहीरनाम्यात समांतर जलवाहिनीचा मुद्दा अग्रस्थानी घेण्यात आला असून यात झालेली अनियमितता, सत्तेतील मोठा भाऊ या नात्याने शिवसेनेमुळे झालेला विलंब, वाढलेला खर्च, गैरव्यवहार या मुद्द्यांना ठळक स्थान देण्यात आले असून फक्त भाजपला सत्ता दिली तर राज्यातील सत्तेच्या मदतीने हा प्रकल्प तातडीने पूर्ण केला जाईल, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात येणार आहे. वर्षभरातच प्रकल्प पूर्ण करून २०१६ मध्ये २४ तास पाणी मिळेल, अशीही ग्वाही देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपने समांतरचा मुद्दा पुढे केल्याने युतीत असतानाच यांच्यात काहीसे वादाचे वातावरण आहे. तरीही भाजपसोबत युती होईल, असा दावा सेनेकडून करण्यात येतो. संपर्कमंत्री विनोद घोसाळकर यांच्याशी संपर्क साधला असता आधी नवी मुंबई पालिकेतील युतीशी चर्चा होणार असून तेथील जागा वाटप झाले तर लगेच औरंगाबादची बोलणी होईल. भाजपचे पदाधिकारी बोलणीसाठी शनिवारी सायंकाळी पुन्हा मुंबईत दाखल झाले असून ते आधी पक्षांतर्गत बोलणी करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर युतीबाबत चर्चा होऊ शकते, असे सूत्रांनी म्हटले आहे.

एकीकडे बोलणीची तयारी दाखवण्यात येत असली तरी तयार होत असलेल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात मात्र समांतरचा मुद्दा वरच्या क्रमांकावर ठेवण्यात आला आहे. समांतरचे नाव जरी काढले तरी सेना उपनेते चंद्रकांत खैरे हे सर्वांनाच धारेवर धरतात. ही योजना मीच आणली अन् मीच पूर्ण करणार असा त्यांचा दावा असतो. ही योजना कोणामुळे लांबत चालली, असा सवाल भाजपकडून जाहीरनाम्यात उपस्थित करण्यात आला आहे. जाहीरनाम्यात समांतरचा मुद्दा आक्रमकपणे घेण्यात आल्याने युतीची भाजपची इच्छा नाही, हे स्पष्ट होते.

सेना बॅकफूटवर जाईल
समांतरचा मुद्दा काढला तर गेल्या १० वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात शिवसेनेलाच अपयश आले, असे चित्र निर्माण करता येईल. त्याला खासदार खैरे वारंवार उत्तर देऊन अडचणी निर्माण करतील अन् सेनेला बॅकफूटवर जावे लागेल, असा भाजपचा होरा असल्याचे समजते. दरम्यान, युती तुटल्याचे समजताच काही कार्यकर्त्यांनी मुकूंदवाडी परिसरात फटाके फोडले.

युती झाली तरी समांतर अटळच
नवी मुंबईत निम्म्या जागा मिळाल्या, येथेही सोयीचे वाॅर्ड मिळाले अन् जर युती झालीच तर समांतरचा मुद्दा दुस-या क्रमांकावर ठेवण्याचे भाजपच्या नेत्यांनी ठरवले आहे. युती झाली तर गैरव्यवहार व विलंबावर भाष्य न करता राज्य सरकारच्या मदतीने तो लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन असेल, असे सूत्रांनी म्हटले आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत समांतरचा मुद्दा मागे घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. समांतरचा मुद्दा अटळ असेल तर युतीचे भवितव्य नेमके काय असेल, याचा अंदाज येतो.
पुढे वाचा... आघाडीचा निर्णय सोमवारी : तटकरे