आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये आता पक्षांतर्गत निवडणुकीचे वेध, डिसेंबरमध्‍ये ठरणार नवीन शहर जिल्हाध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप. - Divya Marathi
शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप.
औरंगाबाद- भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा शहराध्यक्षांची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात येत असल्याने आता मावळत्या पदाधिकाऱ्यांसह सर्वांनाच पक्षांतर्गत निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी बुधवारी (१८ नोव्हेंबर) मुंबईत विद्यमान पदाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कार्यकाल अवघ्या महिनाभराचाच शिल्लक राहिल्याने विद्यमान पदाधिकारी पक्ष कार्यक्रमापासून काहीसे दूर गेल्याचे चित्र दिसत आहे.

शिस्तप्रिय असलेल्या या पक्षात दर तीन वर्षांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होतात. यात प्रदेशाध्यक्षांपासून ते तालुका अध्यक्षांचा समावेश असतो.

गतवेळी झालेल्या निवडीला पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. शहराध्यक्ष भगवान घडामोडे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांची मुदत याच वेळी संपुष्टात येईल. त्यामुळे त्यांच्या जागेवर ताबा घेण्यासाठी शहर जिल्ह्यातील अनेक जण गेल्या काही महिन्यांपासूनच सरसावले आहेत. विशेष म्हणजे सध्या प्रदेश पातळीवर सक्रिय असलेल्या काहींनी हे पद मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले असल्याचे समोर येते.

एक व्यक्ती एक पद असा या पक्षाचा पद देताना फॉर्म्युला असतो. तरीही अन्य पदावर असतानाही शहराध्यक्ष कसे होता येईल, यासाठी अनेक जण जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे समजते.

पुढील महिन्यात निवडणुका होत असल्याने सध्याचे पदाधिकारी पक्षकार्याकडे लक्ष देत नसल्याचीही चर्चा आहे. एखाद्या शाखेचे उद््घाटन असो वा संघटनेचा कार्यक्रम, विद्यमान पदाधिकारी ‘अरे फक्त एकच महिना राहिला. त्यानंतर कार्यक्रम घे’ असे कार्यकर्त्यांना सांगताना दिसतात. संघटनेच्या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्षांना कधी-कधी खिशात हात घालावा लागतो. आता हे पदच औटघटकेचे राहिल्याने खर्च करण्यात अर्थ नाही, हे या मंडळींना उमगले आहे. त्यामुळे खिशात हात घालण्यापेक्षा कार्यक्रमापासून दूर राहिलेले बरे, असे धोरण या मंडळींनी हाती घेतल्याची चर्चा पक्षात जाहीरपणे होत आहे. पदाधिकारी पुढील महिन्यात निश्चित होणार असले तरी त्याची प्रक्रिया याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात पक्षामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड हा एकच निकष राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बैठकीत निर्णय होणार अाहे
निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यासाठी पक्षाचे सर्व शहर जिल्हा पदाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांची बुधवारी मुंबईत बैठक होत आहे. त्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानुसार निवडणुका होतील. शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप.