आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारा स्वदेशीचा, ‘चारा’ चायनीजचा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपु-यातील पक्ष कार्यालयाच्या तीनमजली इमारतीच्या खुल्या जागेत हॉटेल थाटण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर या निर्णयाची लगेच अंमलबजावणीही झाली. येथील लॉटरीचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी असताना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने े कार्यकर्ते पेचात पडले आहेत.
पक्षाने उपलब्ध करून दिलेल्या जागेवरील हॉटेलात चायनीज पदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे एकीकडे स्वदेशीचा नारा आणि कार्यकर्त्यांना चायनीजचा ‘चारा’ असे काहीसे चित्र झाले आहे. हॉटेलात नेमके काय चालते हे बाहेर दिसू नये म्हणून हिरव्या कपड्याने खुली जागा बंदिस्त करण्यात आली आहे.
नेत्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसलेले कार्यकर्ते वेळ घालवण्यासाठी लॉटरी खेळत असत. ते दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी अनेक वेळा केली होती. दुकानदारासोबतचा करार संपल्यानंतर विचार केला जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, लॉटरी बंद करण्याऐवजी इमारतीच्या खुल्या जागेवर हॉटेल थाटण्याचा घाट काहींनी घातला. हाकेच्या अंतरावर देशी दारू विक्रीचे दुकान असल्याने गैरवापर होऊ शकतो, अशी भीती काहींनी व्यक्त केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून एका कार्यकर्त्यास ‘अ‍ॅडजस्ट’ करण्यासाठी हा खटाटोप केल्याचे काही पदाधिका-यांनी सांगितले. हॉटेलधारकाकडून पक्षाला दरमहा काही रक्कमही दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अधिकृत सूत्रांनी त्याचा इन्कार केला आहे.
* कार्यकर्त्यांना चहापानासाठी खूप दूर जावे लागते. त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून येथे एक गाडा उभा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इमारतीच्या खुल्या जागेतील थोड्याशा जागेचा त्याने वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. पक्षाच्या एका कार्यकत्याला रोजगार मिळेल आणि आमची चहापानाची व्यवस्था होईल. त्याच्याकडून भाडे घेण्याचा प्रश्न नाही. गैरवापर होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल.’’ - बसवराज मंगरुळे, शहराध्यक्ष.