आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP On Target In The Shivasena Meeting, Issue About Shivajayanti

शिवसेनेच्या बैठकीत भाजपच लक्ष्य, शासकीय शिवजयंती मोठी झाल्याने शिवसेना चिंतीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शासकीय शिवजयंती म्हणजे केवळ सोपस्कार, असे आतापर्यंतचे चित्र होते. परंतु यंदा ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. याचे कारण म्हणजे यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सहभागी झाला होता. यामुळे शिवसेनेच्या पोटात गोळा उठला असून तिथीनुसार येणारी शिवजयंती यापेक्षा धूमधडाक्यात झाली पाहिजे, असा निर्धार केला आहे.

संघटनात्मक पातळीवर पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आयोजित बैठकीत संघटना वाढवण्यावर भर देण्याऐवजी भाजपलाच लक्ष्य करण्यात आले. शिवसेनेला भाजपची भीती वाटत असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले. जालना रस्त्यावरील पाटीदार भवन येथे आयोजित बैठकीला खासदार तथा उपनेते चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात संतोष जेजूरकर यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
सरकार, संघटना आणि शिवसैनिकांचा समन्वय असा विषय शिरसाट यांना देण्यात आला होता. त्यावर बोलताना शिरसाट म्हणाले, सत्तेची फळे कार्यकर्त्यांना मिळतील, असे अपेक्षित होते; परंतु आमच्यासारख्या आमदारांना जेथे काही मिळाले नाही तेथे सामान्य कार्यकर्त्यांना काही मिळण्याची शक्यता मुळीच नाही. हे शिवसेनेचे नव्हे, तर फक्त भाजपचेच सरकार असल्याचे ते म्हणाले. संघटना आणि आपली भूमिका या विषयावर बोलताना दानवे यांनी शिवसेनेला संघटना म्हणून वाढण्याची गरज असून त्यासाठी प्रत्येक गल्लीबोळात आपले कार्यकर्ते वाढवले पाहिजेत. जेथे वस्ती आहे तेथे शिवसेनेचा कार्यकर्ता असायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याही भाषणात भाजप हा लक्ष्याचा विषय होता. खासदार खैरे यांनीही भाजपच्या वाढलेल्या घडामोडींवर चिंता व्यक्त करताना यंदाची शासकीय शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली असून तिथीनुसार येणारी जयंती यापेक्षा मोठी व्हायला हवी, असे आवाहन त्यांनी केले. दोनदा शिवजयंती व्हावी हा भाजपचाच डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. रावसाहेब दानवे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काढण्यात आलेली रॅली मोठी निघाली. त्यात शिवसेनेतूनच गेलेले कार्यकर्ते होते, परंतु भाजपमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून तेथे काही खरे नाही, असे आपलेच कार्यकर्ते सांगत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे, तर भाजपच आपला खरा शत्रू असल्याचे ते या वेळी म्हणाले.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या महापौरांनी घेतला आहे, परंतु याकडे भाजपकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

सातारा-देवळाईत युती मुळीच नाही
दरम्यान, सातारा तसेच देवळाईच्या दोन वाॅर्डांसाठी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून युती होणार नाही, असे स्पष्ट संकेत या वेळी देण्यात आले. आपल्याला युती करायची नाही, आम्ही स्वतंत्रपणे लढू, असे प्रत्येक वक्त्याने सांगितले. त्यामुळे युतीसाठी भाजपबरोबर चर्चाही होणार नसल्याचे यानिमित्ताने सांगण्यात आले.