आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Opposition Leader Vinod Tavade Comment On Government For Drought

दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही; विनोद तावडे यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळी भागाचा दौरा करताना सरकार या संकटाचा सामना करण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले, असा आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला. चार्‍याचे पैसे द्या, अशी शेतकर्‍यांची, आमदारांची, विरोधकांची मागणी असताना शेतकरी दारूवर पैसे खर्च करेल, अशी कारणे देत सरकार शेतकर्‍यांनाच बदनाम करीत आहे. आपल्या चेल्याचपाट्यांना चारा छावण्या देऊन लूट करण्याची मुभा देत आहे. चारा माफिया, लालूंच्या अनुयायांना रोखण्यासाठी चारा दावणीवरच दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परतल्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले की, रोजगार हमी योजनेची कामे नाहीत. लातूर-उस्मानाबाद जिल्हय़ांत शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन्स तोडले जात आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी विधिमंडळात आम्ही हा विषय मांडणार आहोत. पण हे सरकार उशिरा जाग येऊन काम करते की झोपेचे सोंग घेते ते कळत नाही, असे सांगत तावडे म्हणाले की, रोहयोचा मजुरीचा दर 200 रुपये करा.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत तावडे म्हणाले की, 152 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी सावकारी जाच आणि नापिकीमुळे 72 जणांनी आत्महत्या केल्या. एकट्या बीड जिल्हय़ात 68 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

निधीचे समान वाटप करा
दुष्काळी भागाच्या मदतीसाठी आलेल्या पैशातील 70 टक्के रक्कम पश्चिम महाराष्ट्रात जाते, असा आरोप करीत तावडे म्हणाले की, या निधीचे समान वाटप करायला हवे. पण त्या समितीत पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांचे बहुमत आहे. म्हणून ते पैसे तिकडे ओढतात, हे धोरण बिलकूल मान्य नाही.