आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात भारतीय जनता पक्षाचे यापुढे ‘एकला चलो रे’चे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सुसाट सुटलेल्या भारातीय जनता पक्षाने आता शहरातही ‘एकला चलो रे’ची तयारी सुरू केली आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी शहराची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या दिशेने तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सत्कार सोहळ्यात तसे संकेत दिले. दोन तपे शिवसेनेत घालवलेल्या तनवाणी यांनी शिवसेनेच्या पद्धतीने पुढील निवडणुकीची आतापासून तयारी सुरू केली असून येत्या काही दिवसांत सातारा-देवळाई येथील दोन वाॅर्डांत होणाऱ्या निवडणुकीत याचा पहिला प्रयोग होणार असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे येत्या काळात शिवसेना भाजपमध्ये महानगरपालिकेत तणावाचे चित्र असेल, हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. तनवाणी यांच्याकडे भाजपचे शहराध्यक्षपद गेले तेव्हाच याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर तनवाणी यांनी आपल्या पद्धतीने काम सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याच्या निमित्ताने शहर भाजपच्या वतीने दानवे यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. त्याच वेळी तनवाणी यांनी ‘तुम्ही फक्त सांगा, आम्ही तयार आहोत,’ असे दानवे यांना सांगितले खरे, पण त्याआधीच तनवाणी यांनी प्रत्यक्ष तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले.

साताऱ्यात प्रति आव्हान : आठमहिन्यांपूर्वी सातारा-देवळाईत होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेने आपणहून एकला चलो रेची भूमिका घेतली होती. येथे भाजपचे जाळे नसल्याने भाजपचे धोरण काहीसे नमते होते, परंतु आता आम्हीच येथे स्वतंत्र लढू, असे सांगत भाजपने सेनेला एक प्रकारे प्रतिआव्हान दिल्याचे चित्र आहे. अर्थात, भाजपची भूमिका आक्रमक राहिली तर सेना त्याही पुढे जाऊन आक्रमकता दाखवेल, यात शंका नाही. शहराचा विचार करता कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिक येथे भाजपचा मोठेपणा मान्य करणार नाही. तो दाखवण्याची संधी म्हणजे सातारा-देवळाईतील दोन वाॅर्डांची निवडणूक असल्याचे भाजपच्या अंतर्गत गोटाचे म्हणणे आहे.

सेना स्टाइल अन् नजरही सैनिकांवरच
शिवसेनेत किती नाराज आहेत अन् कोणामुळे याची कल्पना तनवाणी यांना आहे, अशा नाराजांना मानाचे स्थान देत भारतीय जनता पक्षात घेण्याचा तनवाणी यांचा मनसुबा आहे. त्याला दानवे यांनीही केव्हाच हिरवा कंदील दिला आहे. बाहेरून आलेल्यांना मोठी पदे मिळाल्याची जुन्या भाजप कार्यकर्त्यांची तक्रार होती; परंतु पक्ष मोठा करायचा असेल तर या गोष्टींचा बाऊ करण्यात अर्थ नाही, असे पूर्वीच स्पष्टपणे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे एकार्थाने तनवाणी यांना पुढील काळात ‘फ्री हँड’ देण्यात आलेला असेल.

भाजपमधील नाराजांचे आव्हान
तनवाणी यांची मोटार सुसाट धावणार असली तरी त्यांना भाजपमधील जुन्या निष्ठावंतांच्या नाराजीचे आव्हान असणार आहे. तनवाणी यांची शहराध्यक्षपदी निवड झाली तेव्हाच या नाराजांनी तनवाणी विरोधाचे स्पष्ट संकेत दिले होते. तनवाणी यांचा आक्रमकपणा त्यांना नको आहे. ही मंडळी वेळोवेळी तनवाणी यांच्या निर्णयात खोडा घालणार हेही स्पष्ट आहे. मात्र, थेट दानवे यांचाच हात पाठीवर असल्याने तनवाणी यांचा निर्णय शहराच्या हद्दीत अंतिम असेल, असा अनेकांचा कयास आहे. येत्या काही दिवसांत शहर भाजपत आणखी काही जणांचा प्रवेश असल्याची चर्चा आहे.