आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेडलीमुळे बाजू मजबूत : अमित शहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डेव्हिड हेडलीने दिलेल्या जबाबामुळे २६-११च्या मुंबई हल्ला प्रकरणात भारताची बाजू मजबूत झाल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय संघटनमंत्री सतीश वेलणकर यांना परभणी येथे भेटण्यासाठी जाण्याकरिता ते शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) औरंगाबादेत आले होते. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या िनवासस्थानी विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत त्यांनी हे मत नोंदवले.

हेडलीची जबानी महत्त्वाची आणि भारताच्या फायद्याचीच आहे, असे सांगताना या विषयावर अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदी योगी आदित्यनाथ यांची निवड होणार का, या प्रश्नावर अजून १४ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष ठरणे बाकी आहे, असे उत्तर त्यांनी दिले. मी फार पूर्वीपासून प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळतो. मी एक मासूम, भोळा माणूस असल्याची मखलाशीही त्यांनी केली. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार शहा सुभेदारी विश्रामगृहावर मुक्काम करणार होते. मात्र, तेथे शुक्रवारी रात्री विधिमंडळ विशेषाधिकार समितीसाठी शिवसेनेतर्फे भोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने शहांना दानवेंच्या निवासस्थानी स्थलांतर करावे लागले.