आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने केली सेनेचे उट्टे काढण्याची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - शहरातील दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण तसेच पालिकेच्या पर्यटन केंद्राच्या उद्घाटनासाठी शिवसेनेने कुरघोडी केली. शिष्टाचारात नसतानाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना पुढे करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला, त्याचबरोबर याचे सेनेला प्रत्युत्तर देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

येत्या काळात शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात याचे उट्टे काढले जाईल, त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पाचारण करून भाजपचे मंत्री तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान देतानाच शिवसेनेचे मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांना ठरवून डावलण्याची रणनीती आखली जाणार आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचा विचार करता युती स्थापन झाल्यापासून आजतागायत शिवसेनेनेच मित्रपक्षावर दादागिरी केली आहे. दोन्ही पुलांचे लोकार्पण, पर्यटन कक्षाचे उद््घाटन या दोन्ही कार्यक्रमाचे नियोजन करतानाही सेनेने आपली दादागिरी कायम ठेवली. कार्यक्रम पत्रिका तयार करताना आदित्य ठाकरे यांचे नाव सर्वात आधी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यापेक्षाही ठळक अक्षरात घेण्यात आले होते. शिष्टाचार विभागाने याला आक्षेप घेतल्यानंतर दोघांची नावे बरोबरीत घेण्यात आली. हे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना खटकले. राज्यात भाजप हा मोठा पक्ष असल्याचा विसर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पडला असला तरी पालिकेतील मोठा भाऊ या नात्याने त्यांनी दादागिरी केलीच. आपण आता राज्यात मोठे आहोत, तेव्हा याचा वचपा काढला पाहिजे, असे भाजपच्या स्थानिक कर्त्याधर्त्यांनी ठरवले आहे. येत्या काळात भूमिपूजन, लोकार्पण असा कोणताही कार्यक्रम नियोजित नाही. तरीही मनपा किंवा अन्य शासकीय कार्यालयाकडून एखादा कार्यक्रम होईल, त्यात शिवसेनेला मुद्दाम डावलायचे असे ठरले आहे. सत्ता वाटपाच्या करारानुसार येत्या चार महिन्यांनी शहराचे महापौरपद भाजपकडे येणार आहे. तेव्हा पालिकेच्या कार्यक्रमासाठी कोणाला बोलवायचे हे ठरवण्याचे अधिकार आपोआपच भाजपकडे येईल. तेव्हा याचा वचपा काढला जाऊ शकतो, असे सूत्रांनी म्हटले आहे.

शीतयुद्ध सुरू
एकूणच सोमवारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्यातून अनेक लहान-मोठे मानापमान नाट्य येत्या काही दिवसांत घडतील, असे सांगण्यात येते. कारण कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे भाजपने ठरवले आहे.
बातम्या आणखी आहेत...