आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना-भाजपची महानगरपालिका दिवसभर एमअायएमने सांभाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पक्षाच्या बैठकीसाठी भाजपचे पदाधिकारी मुंबईत, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक मुंबईत, असे चित्र पाहायला मिळाल्याने मनपात आज शुकशुकाट पाहायला मिळाला. एमआयएमच्या पदाधिकारी नगरसेवकांचीच हजेरी तेवढी दिसून आली. त्यामुळे शिवसेना भाजपची सत्ता असलेली मनपा एमअायएमने सांभाळली, असे चित्र अाज पाहायला मिळाले.

काल मनपा अायुक्तपदाचा कार्यभार प्रकाश महाजन यांच्याकडून काढून अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे देण्याचे आदेश आले. सायंकाळी ही घटना घडल्यानंतर आज मनपात नगरसेवक पदाधिकाऱ्यांची भरपूर वर्दळ असेल असे वाटले होते; पण चित्र वेगळेच होते. मनपात शुकशुकाट होता. एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी त्यांचे काही नगरसेवक तेवढे मनपात होते. अधिक माहिती घेतली असता शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी मुंबईत गेल्याचे समोर आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवतीर्थावर अायोजित कार्यक्रमासाठी ही मंडळी गेली होती. दुसरीकडे भाजपच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत एक बैठक बोलावण्यात आली होती. त्याला भाजपचे मनपातील पदाधिकारी हजर होते. त्यामुळे आज मनपात सत्ताधारी शिवसेना भाजपऐवजी एमआयएमचेच राज्य दिसत होते.

तिकडे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक गेले होते. याशिवाय इतर कामांसाठी ते या विभागातून त्या विभागात फिरताना सायंकाळपर्यंत दिसून आले.