आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप शहराध्यक्ष घडामोडे यांच्यावर खासदार खैरे बरसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रस्त्यांच्या यादीवरून संतापलेल्या भाजप पदाधिकार्‍यांच्या प्रतिक्रियांमुळे खासदार चंद्रकांत खैरे भडकले असून शुक्रवारी त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांना फैलावर घेत तुमच्या पदाधिकार्‍यांना सांभाळा, त्या गटनेत्याला मारेन अशा शब्दांत सुनावले. या मुळे दुखावलेल्या घडामोडे यांनी मी मुंडे साहेबांशी या विषयावर बोलतो असे सांगत तुम्ही आमच्या पदाधिकार्‍यांबाबत असे बोलू नका आम्ही त्यांना बोलू असे सुनावले.

शहरात 30 कोटी रुपये खर्चून 17 रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी रस्त्यांची यादी तयार करताना भाजपच्या नगसेवकांना डावलण्यात आल्याने भाजपचे पदाधिकारी संतापले. यादी जाहीर झाल्यावर त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मनपातील भाजपचे गटनेते संजय केणेकर यांनी तर आमदार, खासदार आणि अधिकार्‍यांनी मिळून ही यादी तयार केली असून भाजप हे खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया देत ही यादी आम्हाला अमान्य असल्याचे जाहीर केले होते. युतीतील दुफळी पुन्हा समोर आली असून शिवसेनेतही भाजपच्या या आक्रस्ताळेपणाविरोधात राग आहे.

या रागाचे प्रत्यंतर शुक्रवारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्यावरून पाहायला मिळाले. सायंकाळी बलवंत वाचनालयात एका प्रदर्शनाला भेट द्यायला आलेल्या खैरेंचे स्वागत करायला तेथे उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर आणि इतर मंडळी सरसावली. त्यावर घडामोडे यांना पाहताच खासदार खैरे यांनी संताप व्यक्त केला. भाजपची गुपचिळी, खैरेंचे नो कॉमेंट या प्रकाराबाबत भाजपच्या नेत्यांनी असे फार काही मोठे झाले नाही, अशी गुळमुळीत प्रतिक्रिया दिली. शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी तर फोन घेतलाच नाही. मात्र, बोराळकर यांनी मनपाबाबत त्यांच्यासोबत बोलणे झाले असे सांगत झाल्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

मोदींना पंतप्रधान करायचे आहे ना ?
खासदार खैरे म्हणाले की, तुम्ही तुमच्या पदाधिकार्‍यांना सांगा. काहीही कसे बोलतात? तुमचा गटनेता दिसला तर मी मारेन. हे वाक्य ऐकताच घडामोडे यांनी त्यांना असे बोलू नका, तो आमच्या पक्षाचा विषय आहे. मी बोलेन त्यांच्याशी. पण त्यावरही खैरे शांत राहिले नाहीत त्यांनी मोदींना पंतप्रधान करायचे आहेना असा प्रश्न केला. यावर घडामोडे यांनी तुम्हाला पण निवडून यायचे आहे असे सांगत तिथून काढता पाय घेतला. आपण याबाबत मुंडे साहेबांशी बोलणार आहोत असे सांगत ते बाहेर पडले. हा प्रकार पाहून स्तंभित झालेल्या शिरीष बोराळकर यांनी घडामोडे यांना परत बोलावण्यासाठी धाव घेतली, पण त्यांचे न ऐकता घडामोडे निघून गेले.