आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदाचे पक्के जुगाड जमत असेल तर कामाला लागा: भाजपचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेत गेल्या अडीच दशकांपासून अभेद्य असलेल्या शिवसेना भाजप युती तुटण्याचे संकेत मिळत आहे. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या भाजप नगरसेवकांचीही तशीच इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर ‘जर महापौरपदाचे जुगाड जमणार असेल तर कामाला लागा’ अशी सूचना पक्षाच्या नेत्यांनी दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतरही अवघ्या काही महिन्यांनी झालेल्या पालिका निवडणुकीतील युती कायम राहिली होती. त्यात भाजपच्या वाट्याला ११ महिन्यांचे महापौरपद मिळाले. पुढील अडीच वर्षाचे महापौरपद मिळवण्यासाठी आता पक्षातील इच्छुक कामाला लागले आहेत. 
 
पालिकेत यापूर्वी युतीत तणाव झाला होता. परंतु युती तुटेपर्यंत प्रकरण गेले नाही. छावणी परिषद निवडणुकीत सेनेने भाजपची साथ सोडली होती. तेव्हा युती तुटण्याची भाषा झाली खरी, परंतु पुढे काही झाले नाही. विजया रहाटकर यांनी २००८ मध्ये महापौरपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे करारानुसार सेनेचा महापौर होऊ शकला नाही. तेव्हाही युती तुटेल असे सर्वांनाच वाटले होते. परंतु तसे काही झाले नाही. २०१५ च्या निवडणुकीत तर युती होणारच नाही, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. कारण महिन्यांआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युती झाली नव्हती. तरीही युती झाली. त्यामुळे येथे पाच वर्षे युतीला छेद पडणार नाही, असे चित्र होते. अगदी काल परवापर्यंत हेच चित्र कायम होते. परंतु भाजपमधील इच्छुकांनी पक्षाकडे तशी मागणी केल्यानंतर चित्र पूर्णपणे बदलल्याचे सांगण्यात येते. महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी ओबीसी (इतर मागासवर्ग) प्रवर्गासाठी आरक्षित आहे. भाजपमध्ये या प्रवर्गातील तगडे नगरसेवक आहेत. 

शिवसेनेला धोबीपछाड देण्याची हिंमत त्यांच्यात असल्याचा दावा श्रेष्ठींकडे करण्यात आला. त्यामुळे जर जुगाड व्यवस्थित जमत असेल तर कामाला लागा. ऐनवेळी पराभव पदरी पडणार नसेल तरच हे शक्य असल्याचे इच्छुकांना सांगण्यात आले. त्यामुळे स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप थोरात, माजी उपमहापौर प्रमोद राठोड आणि शहरप्रमुख किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी हे कामाला लागले आहेत. थोरात आणि राठोड यांना यापूर्वीच पदे देण्यात आली असली तरी ते स्पर्धेत पुढे असल्याचे सांगण्यात येते. तनवाणी हे अपक्ष आहेत, परंतु त्यांनी शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत केले होते. त्यामुळे त्यांनाही संधी मिळण्याची संधी आहेच. विद्यमान महापौर भगवान घडमोडेही याच प्रवर्गात येतात. मला खुपच कमी कालावधी मिळाला, असे सांगत ते दावा करू शकतात. त्यामुळे यापुढील काळात ११५ नगरसेवकांतून विजयाचा आकडा गाठण्यासाठी गणिते मांडली जाणार आहेत. दरम्यान, युती तुटल्याने पालिकेतील अपक्षांना ‘महत्त्व’ येणार आहे. त्यामुळे ही मंडळी कमालीची खुश आहे. 
 
भाजपमधील ओबीसी प्रवर्गाचे नगरसेवक 
दिलीपथोरात, प्रमोद राठोड, राजू तनवाणी, नितीन चित्ते, अर्चना नीळकंठ, मनीषा मुंडे, शोभा वळसे, पूनम बमणे, विमल केंद्रे, कमल नरोटे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यमान महापौर भगवान घडमोडे. 
बातम्या आणखी आहेत...