आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या गडात भाजपची घुसखोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘शिवसेनेसोबतच विधानसभा निवडणूक लढवणार’ असे सांगत असलेल्या भाजपने सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांसाठीही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही भाजपची रणनीती सुरू असल्याचेच समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील भाजप इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी शहरात घेण्यात आल्या. त्यात भाजपकडील मतदारसंघांसाठी तर इच्छुकांनी मुलाखती दिल्याच; पण शिवसेनेच्या ताब्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड या मतदारसंघांसाठी इच्छुक असणा-यांनाही त्यांचे दावे मांडण्याची संधी दिली. त्यामुळे स्वबळाच्या चर्चेला खतपाणी मिळाले. आतापर्यंत गोपीनाथ मुंडे म्हणतील तोच भाजपचा उमेदवार असायचा. शिवसेना विरोधात सूरही उमटत नव्हता. मात्र, मुंडेंचे निधन, लोकसभेतील यशामुळे यंदा चित्र बदलले. औरंगाबाद पश्चिम, मध्य वगळता सर्व मतदारसंघांत लढण्यास तयार असल्याचे इच्छुकांनी सांगितले. शिवसेनेकडून मतदारसंघ खेचा, बाकी काम आम्ही फत्ते करतो, असाही इच्छुकांचा दावा होता. इच्छुकांच्या मुलाखती निरीक्षक आमदार रणजित पाटील, प्रदेश चिटणीस जमाल सिद्दिकी यांनी घेतल्या.

० गंगापूर - किशोर धनायत,
जे. बी. पवार, गंगाराम हिवाळे
० कन्नड - संजय खंबायते, काकासाहेब तायडे
० पैठण - रेखा कुलकर्णी, रघुनाथ आगलावे, लक्ष्मण आवटे, गोपीनाथ वाघ,
सचिन खेडकर.
० वैजापूर - संभाजी कलापुरे, कैलास पवार, प्रकाश
गायके, पंकज मतसागर, नारायण तुपे.
० फुलंब्री - हरिभाऊ बागडे, एकनाथ जाधव, डॉ. भागवत कराड, बापू घडामोडे, सुरेंद्र साळुंके, भाऊसाहेब दहिहंडे, आसाराम तळेकर, डॉ. नामदेव गाडेकर, सुहास शिरसाठ, तारुअप्पा मेटे, विकास दांडगे, प्रदीप पाटील, विवेक चव्हाण, सज्जनराव मते, डॉ. नारायण फड इच्छुक.
० सिल्लोड- सुरेश बनकर पाटील, सांडू पाटील लोखंडे, किरणदेवी जैस्वाल, राजेंद्र जैस्वाल, डॉ मच्छिंद्र पाखरे, कैलास जवंजाळ, श्रीरंग पाटील साळवे, ज्ञानेश्वर मोटे, दिलीप दाणेकर, इद्रिस मुलतानी, अशोक गरुड, सुनील मिरकर.
० औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, विजया रहाटकर, संजय केणेकर, संजय जोशी, बसवराज मंगरुळे.

पहिल्या यादीत पूर्व घोषित करा
पूर्व मतदारसंघात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डांशी टक्कर होणार आहे. दर्डांची अर्थपूर्ण क्षमता लक्षात घेता त्यांच्याविरोधातील उमेदवार पहिल्या यादीतच घोषित करावा, म्हणजे तयारीसाठी वेळ मिळू शकेल, असे सर्वच इच्छुकांनी सांगितले. मला लवकर उमेदवारी दिली तर भाजप विजयी होईल, असा दावाही एकाने केला.

चेहरा बदला : यापूर्वी लढलेल्यांना आता बदला, असा आग्रह सर्वच मतदारसंघांतील इच्छुकांनी धरला. त्यांचा रोख सुरेश बनकर (सिल्लोड), भागवत कराड (औरंगाबाद पूर्व), हरिभाऊ बागडे (फुलंब्री) यांच्याकडे होता.

मुलाखतीनंतर रात्री आठच्या सुमारास अतुल सावे, डॉ. भागवत कराड, बसवराज मंगरुळेंचे समर्थक निरीक्षकांना भेटले. त्यामुळे संजय केणेकर संतापले. त्यांनी सावे, कराड, मंगरुळेंना जाब विचारला. यामुळे वातावरण तापले होते.

शिवसेनेतील लाथाळीवर भर : कसे निवडून येणार, असा थेट प्रश्न इच्छुकांना होता. त्यावर विकासकामे हाच निकष आहे, असे भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांनी सांगितले. तर शिवसेनेकडील मतदारसंघावर हक्क सांगणा-यांनी शिवसेनेतील लाथाळी, पदाधिका-यांचे विकासाकडे दुर्लक्ष असे बारकाव्यांसह स्पष्ट केले.