आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद तालुका खरेदी-विक्री संघावर भाजपची सत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - औरंगाबादतालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे अप्पासाहेब शेळके तर उपाध्यक्षपदी औताडे गटाचे अण्णासाहेब मुगदळ यांची निवड झाली आहे.
औरंगाबाद तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी सोमवारी तालुका सहकारी उपनिबंधक कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यात अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अप्पासाहेब शेळके यांनी तर काँग्रेस पॅनलमधून विजयी झालेले लक्ष्मण औताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बहुमताच्या आधारे हात उंचावून मतदान घेतले असता भाजपचे अप्पासाहेब शेळके यांच्या बाजूने आठ तर काँग्रेसचे लक्ष्मण औताडे यांच्या बाजूने सात मते पडली. त्यामुळे निर्वाचन अधिकारी दिनकर मसलेकर यांनी अप्पासाहेब शेळके यांना अध्यक्ष म्हणून विजयी झाल्याचे घोषित केले.

त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलकडून औताडे गटाचे अण्णासाहेब मुगदळ यांनी तर काँग्रेसच्या पॅनलकडून औताडे गटाचे अशोक काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तेव्हा भाजपच्या विश्वनाथ पठाडे, सुदाम उकर्डे, अप्पासाहेब शेळके, छायाबाई पवार, शशिकलाबाई उकर्डे, धनाजी तळेकर, शिवसेनेचे नाना पळसकर यांनी अण्णासाहेब मुगदळ यांना हात उंच करून मतदान केले. तर काँग्रेसच्या अशोक काकडे यांच्या बाजूने काँग्रेस पॅनलमधील पुंडलिक अंभोरे, लक्ष्मण औताडे, मोहन काळे, गुलाब म्हस्के, दत्तू ठोंबरे, देविदास चव्हाण यांनी हात उंचावून मतदान केले.

अण्णासाहेब मुगदळ यांना आठ तर अशोक काकडे यांना सात मते मिळाली. एक मत जास्त मिळाल्याने अण्णासाहेब मुगदळ विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून दिनकर मसलेकर यांनी काम पाहिले. त्यांना सहायक निर्वाचन अधिकारी आर.के. आर्य, व्ही.डी. कुलकर्णी तसेच खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण पोफळे, के.एस.पठाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

औरंगाबाद मतदारसंघात काही भाग असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील खरेदी-विक्री संघ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका, त्यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका अत्यंत चुरशीने झाल्या. खरेदी-विक्री संघाची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र मिळून लढवली. यात काँग्रेसला आठ तर भाजप-सेनेला सात जागा मिळाल्या. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विलासबापू औताडे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे स्वतंत्र दोन गट पडले. त्यामुळे चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विलासबापू औताडे यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही. डॉ. कल्याण काळे गटाने सात तर भाजपने सहा, भाजप बंडखोरांनी दोन जागा जिंकल्या.

खरेदी-विक्री संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढवलेल्या निवडणुकीत विलासबापू औताडे गटाचे दोन उमेदवार विजयी झाले होते. औताडे गटाचा समर्थक म्हणवणाऱ्या अण्णासाहेब मुगदळ यांनी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे तालुका खरेदी-विक्री संघ भाजपच्या ताब्यात गेला आहे.

अप्पासाहेब शेळके अण्णासाहेब मुगदळ
औरंगाबाद तालुका खरेदी-विक्री संघात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढलो होतो. यात राष्ट्रवादीचे संचालक काँग्रेसचे संचालक निवडून आले होते राष्ट्रवादीचा चेअरमन काँग्रेसचा व्हाइस चेअरमन करण्याचे ठरले होते. तसेच निवडणुकीचे नेतृत्व माजी आमदार डॉ. कल्याण काळे, पांडुरंग तांगडे, पुंडलिक अंभोरे यांनी केले होते. बहुमत असताना माझी चेअरमनपदी निवड होण्याच्या आधीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझा विश्वासघात केला असल्याचा आरोप संचालक लक्ष्मण औताडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्यासोबत भाऊबंदकी केली त्यांच्या विश्वासातील त्यांनी उमेदवारी दिलेला आणि काँग्रेकडून बिनविरोध निवडून आलेला अण्णासाहेब मुगदल याला भाजपच्या गोटात नेऊन सोडले. त्यामुळे माझा एका मताने पराभव झाला. मला जसे राजकारण कळते तसे मी ज्यांचे काम केले त्यांनीच ऐनवेळी माझा विश्वासघात केला. हा माझा पराभव नसून काँग्रेसचा पराभव असल्याचे पत्रकात लक्ष्मण औताडेंनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...