आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारी सरकारविरोधात भाजपचा एल्गार - देवेंद्र फडणवीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - यूपीएविरुद्धच्या आंदोलनात आज भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचार, महागाई आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. मराठवाड्यातील जनतेवर राज्यातील सरकारने सर्वाधिक अत्याचार केले आहेत. त्यामुळे या सरकारविरुद्ध एल्गार पुकारल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.


औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानक चौकी परिसरात भाजपच्या वतीने जेलभरो करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. जवळपास तीन ते चार हजार लोक या सभेला हजर होते. युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे यांनीही सरकारवर
तोफ डागली. सामान्य माणसासाठी काही करण्याची सरकारची भावनाच संपली, असा आरोप त्यांनी केला.


भाजपच्या वतीने यूपीए सरकारच्या विरोधात गुरुवारी जेल भरो आंदोलन पुकारले होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे येणार असल्यामुळे भाजपच्या वतीने या आंदोलनासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. सुरुवातीला सभा घेण्यात आली. यामध्ये सर्वच नेत्यांनी सरकारची धोरणे आणि भ्रष्टाचाराविरोधात टीका केली.


फडणवीस म्हणाले, सरकारच्या विरोधातला हा असंतोषच या गर्दीच्या रूपाने समोर आला आहे. काँग्रेसने लाखो कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. 2 जी, कोळसा यांसारख्या घोटाळ्यांनी देशाचे मोठे नुकसान केले आहे. हा पैसा योग्यरीत्या खर्च केला असता तर गरिबी दूर झाली असती. मात्र, यूपीएच्या काळात धनदांडगे गब्बर होत आहेत. दहा वर्षांत अंबानी बंधूंची संपत्ती पन्नास हजार कोटींवरून पाच लाख कोटींची झाली आहे; मात्र गरिबांच्या घरांवरचे छप्पर उडाले आहे. त्यामुळे हा लढा जनतेसाठी असल्याचेही फडणवीस म्हणाले.


निर्लज्ज मंत्री
सिंचनासाठी राज्य सरकारने आतापर्यंत सत्तर हजार कोटी रुपये खर्च केले आहेत; मात्र एक टक्काही सिंचन झाले नाही. दुष्काळ पडल्यानंतर प्रभाकर देशमुख उपोषणाला बसल्यानंतर अजित पवार ‘धरणात लघुशंका करू का?’ असे म्हणतात. याचा समाचार घेताना इतका निर्लज्ज मंत्री आपण आपल्या कारकीर्दीत पाहिला नसल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यातील लोकांचा असंतोष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अजित पवारांना बारामतीमध्येदेखील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राज्यात सर्वात जास्त महागड्या दराने वीज विक्री केली जात आहे. बाजूच्या राज्यात वीज दर स्वस्त आहे. त्यामुळे उद्योजक राज्यात येण्यास तयार नाहीत. शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही. महागाई मात्र वाढत आहे. सरकारने फक्त दलालांची फौज तयार केली आहे. त्यामुळे ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा नारा नरेंद्र मोदींनी दिला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादीमुक्त राज्य करण्याचा नारा फडणवीस यांनी दिला.


खास आदमीकडे लक्ष
महाराष्ट्र सरकार आम आदमीकडे दुर्लक्ष करत असून फक्त खास आदमीकडे लक्ष देत आहे. दुष्काळ मराठवाड्यात असताना पैसै वाटप मात्र पश्चिम महाराष्ट्रात होत असल्याचा आरोप प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. राहुल गांधी, शरद पवार सारे नेते मराठवाड्यात येऊन गेले. मात्र, शेतक-यांच्या अवस्थेत काहीही फरक पडला नाही. जळालेल्या बागांना अजूनही निधी मिळालेला नाही. त्यामुळे सरकारविरुद्धचा हा संघर्ष गावच्या वेशीपर्यंत नेणार असल्याचे आव्हानच दानवे यांनी विरोधकांना दिले.


शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. भागवत कराड यांनीदेखील या वेळी भाषणे केली. माजी महापौर विजया रहाटकर, उपमहापौर संजय जोशी, नारायण कुचे, शिरीष बोराळकर, संजय केणेकर, बसवराज मंगरुळे उपस्थित होते. आंदोलनानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जेल भरो केले. या वेळी उडालेल्या गोंधळात संजय केणेकर जखमी झाले.

वाह रे सोनिया तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल !; आमदार पंकजा पालवे यांची टीका
राज्यात सध्या सरकारची सामान्य माणसासाठी काहीही करण्याची भावनाच उरली नाही. दर महिन्याला येते ती महागाई आणि नेहमी पडतो तो दुष्काळ, अशी नवीन ओळख आता झाली आहे. ‘वाह रे सोनिया तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’, अशी तोफ युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे यांनी सरकारवर डागली.


त्या म्हणाल्या, दुष्काळात सर्वाधिक मराठवाडा होरपळला. जनावरे दावणीला बांधली गेली; मात्र या जनावरांसोबत माणसेही दावणीला बांधली गेली होती. तरीही सरकार निधी देत नव्हते. सिंचनाचे पैसे खाणा-या तटकरेंनी संजय गांधी निराधार योजनेचेही पैसे खाल्ले; तर मंत्रिमडंळातून चोर गेले आणि दरोडेखोर आले, अशी अवस्था आहे. लग्नात सर्वाधिक पैसे खर्च करणा-याला प्रदेशाध्यक्ष आणि अधिका-यांना मारणा-यांना कार्याध्यक्ष केले जाते, असा निशाणा मुंडे यांनी भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर साधला. आपल्या खांद्यावर आता प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी आहे. हे सोपे काम नाही. 18 ते 25 वयोगटातल्या युवकांचा पहिला चॉइस भाजपच राहणार यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तरुणांचे प्रश्न सोडवण्यावरदेखील भाजप भर देणार असल्याची ग्वाही मुंडे यांनी दिली.


कोण काय म्हणाले ?
श्रीकांत जोशी : देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते बोलायला लागले की, मंत्र्यांना घाम फुटतो. मराठवाड्यात आल्यानंतर फडणवीस यांचे जोरदार स्वागत करायचे होते; मात्र आमच्या संवेदनशील नेत्याने दुष्काळ असल्यामुळे कोणतेही स्वागत स्वीकारले नाही. ही संवेदना भाजपमध्ये आहे. राष्ट्रवादीचे नेते फक्त हप्ता गोळा करत आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील फक्त हप्ता गोळा करत आहेत. त्यामुळे पोलिसदेखील कंटाळले आहेत.
हरिभाऊ बागडे : देशामध्ये सध्या काँग्रेसची लूटमार सुरू आहे. गरीब आणखी गरीब होत चालला आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे. दुष्काळामध्ये जळालेल्या बागांसाठी सर्वच नेत्यांनी निधी देणार असल्याचे आश्वासन दिले होते; मात्र अजूनही हा निधी शेतक-यांना मिळाला नाही. शेंद्रा एमआयडीसीमध्ये शेतक-यांकडून जमिनी घेतल्या. अजूनही प्रकल्प सुरू होत नाहीत.
सुधीरसिंह ठाकूर : आघाडीच्या सरकारने सर्वाधिक अन्याय मराठवाड्यावर केला आहे. त्यामुळेच मराठवाड्यात ही सभा घेतली जात आहे. शेतक-यांच्या हक्कासाठी ही अंतिम लढाई आहे. सामान्य शेतक-यांना लुटण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.