आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या विजयाचा आनंद; सलूनवर सूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचे पानिपत झाले असून भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशाने आनंदित झालेले नारळीबाग येथील भाजप कार्यकर्ता व सलून व्यावसायिक गणेश पारसवार यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त कटिंग, दाढी, मसाज, फ्रेशर, हेअर डाय आदींसाठी पुढील 5 वर्षे 50 टक्के सूट देण्याचा अभिनव निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर ही सूट 75 टक्क्यांवर जाणार आहे.

भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आहे. त्यानंतर चार राज्यांत झालेल्या निवडणुकांत लोकांनी त्यांच्या नेतृत्वाला पावती दिल्याचे मानले जात आहे. छत्तीसगड व मध्य प्रदेशमध्ये तर भाजपने हॅट्ट्रिक केली आहे. राजस्थानात काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली आहे. यामुळे भाजपच्या सत्तास्थापनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दिल्लीत मात्र आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांनी करिष्मा करून भाजपला रोखून काँग्रेसला धूळ चारली आहे.

दरम्यान, 25 डिसेंबर रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील पाच वर्षे औरंगाबादेतील भाजप कार्यकर्ता (मध्य विभाग सचिव व पूर्व अपंग सेलचे अध्यक्ष) गणेश पारसवार यांनी सलूनमध्ये 50 टक्के सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशात भाजपची सत्ता येऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर नारळीबागबरोबरच सिडकोमध्ये नवीन सलून सुरू करून 75 टक्के सूट देणार असल्याचे पारसवार सांगतात. सूट का देणार, असे विचारले असता, सत्ताधारी पक्षाने महागाई कमी करण्याऐवजी वाढवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसमोर उदनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आह अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे पारसवार एका पायाने अपंग आहेत.