आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्‍हा परिषदेत 19 वर्षांनंतर भाजपला संधी, सेनेचा पाठिंबा लागणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जि. प. तील यशानंतर गुलमंडीवर विजयोत्सव साजरा झाला. तेव्हा भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी अनिल चोरडियांसोबत फुगडीचा फेर धरला. छाया: मनोज पराती - Divya Marathi
जि. प. तील यशानंतर गुलमंडीवर विजयोत्सव साजरा झाला. तेव्हा भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी अनिल चोरडियांसोबत फुगडीचा फेर धरला. छाया: मनोज पराती
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा परिषदेत ६२ पैकी २३ जागा जिंकून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे १९ वर्षांनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले. गेल्या दोन दशकांत जेव्हा सत्तेची संधी मिळाली तेव्हा शिवसेनेने कायम भाजपची बोळवण उपाध्यक्षपदावर केली होती. हे चित्र यंदा बदलले अाहे.
 
मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला लाल दिव्याची गाडी मिळते. आता पुढील पाच वर्षे भाजपचे सदस्य लाल दिव्याच्या गाडीत मिरवणार आहेत. त्यातील पहिले अडीच वर्षे अध्यक्षपद महिला राखीव आहे. 
 
१९९८ मध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी ताकद पणाला लावत आसाराम तळेकर यांना अध्यक्षपदी विराजमान केले होते. तळेकरांकडे हे पद आठ महिनेच राहिले. त्यानंतर भाजप सेनेच्या मागे अशीच स्थिती होती. यंदाही औरंगाबाद जिल्ह्यात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरेल, असे गुरुवारी सकाळपर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनाही वाटत नव्हते.
 
शिवसेना भाजपच्या वादात आणि नोटबंदीमुळे आपली सदस्य संख्या १५ च्या पुढे आणि २० च्या आसपास जाईल, असे गणित काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मांडले जात होते. मात्र, शिवसेनेला मागे टाकून पुढे जाता येईल, असा दावा कोणीही करत नव्हते. परंतु जसजसे निकाल हाती येत गेले आणि भाजपची भरारी लाल दिव्याच्या दिशेने निघाली. सर्व जागांची मोजणी झाली तेव्हा सेनेला मागे टाकून जिल्ह्याच्या राजकारणात आता आपण मोठे भाऊ असल्याचे भाजपने दाखवून दिले. 
 
कार्यकर्तेजोडल्याने...: लोकसभानिवडणुकीतील मोदी लाटेनंतर विधानसभा निवडणूक या पक्षाने स्वतंत्रपणे लढवली. त्यामुळे अर्थातच कार्यकर्ते जोडले गेले. त्यानंतरच्या नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपला बळ मिळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी पक्षाने केली होती. त्यामुळे आधीपासूनच अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावण्यात आला.
 
मनसे, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला आलेली मरगळ भाजपच्या पथ्यावर पडली. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील तगडे कार्यकर्ते भाजपमध्ये स्थानापन्न झाले. इकडे शिवसेनेनेही जोरदार तयारी केली होती. परंतु अंतर्गत वादामुळे त्यांना त्यांच्या यशाचा आलेख वाढवता आला नाही. 
 
युतीबाबत तूर्तास संभ्रम : जिल्हापरिषद निवडणुकीत अनपेक्षितपणे मुसंडी घेत भाजप क्रमांक एकवर पोहोचला असला तरी बहुमतासाठी त्यांना कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे. मुंबईत शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येथे युती होणार की नाही, यावर तूर्तास संभ्रम आहे. आम्ही सेनेबरोबरच युती करणार आहोत, आता त्यांनीच पुढे यावे, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.
 
मात्र, सेना सध्या कोणताही विचार करण्याच्या मन:स्थितीत नाही. अर्थात दोन्ही गोटांतील नेत्यांनी सांगितले की, येथे शिवसेना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत जाण्याची सूतराम शक्यता नसल्याने काहीही झाले तरी युती होईलच. 
 
बदला घेण्याची संधी: आतापर्यंतशिवसेना कायम भाजपवर दादागिरी करत आली आहे. १९९८ मध्ये आसाराम तळेकर वगळता दुसऱ्यांदा भाजपला अध्यक्षपद दिले गेले नव्हते. पुढील पाचही वर्षांसाठी अध्यक्षपद आपल्याकडेच असावे, असे भाजपच्या नेत्यांनी उत्साहाच्या भरात सांगून टाकले आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासह काही विषय समित्यांचे सभापतिपद सेनेला मिळेल आणि कोणत्याही परिस्थितीत पुढील पाच वर्षे भाजपचा अध्यक्ष असेल, अशी रणनीती निश्चित करण्यात येत आहे. 

आम्ही सेनेशी विनाशर्त युती करण्यास तयार आहोत. आतापर्यंत युती करताना जो फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला या वेळीही असेल. ज्या पक्षाची सदस्यसंख्या जास्त, त्यांचा अध्यक्ष आणि ज्याची सदस्य संख्या कमी त्याचा उपाध्यक्ष. अन्य विषय समित्यांच्या वाटपात ऐनवेळी निर्णय घेतला जाऊ शकेल, असे स्थानिक नेत्यांनी सांगितले. गत निवडणुकीत जागा पटकावणाऱ्या भाजपने यंदा २३ जागांपर्यंत मजल मारली. सेना १९ वरून १८ जागांवर तर काँग्रेसची सदस्य संख्या १४ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस११ वरून तर मनसे वरून एकवर आली. 
 

युतीसाठी विनाशर्त तयार 
आम्ही सेनेशी युती करण्यास विनाशर्त तयार आहोत. पूर्वीच्याच फॉर्म्युल्याने सत्तेचे वाटप होईल. शिवसेना सोबत आली नाही तर पुढे काय करायचे ते नंतर ठरवू - एकनाथजाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप. 
 
बोलू शकत नाही 
युतीबाबत स्थानिक पातळीवर आम्ही काहीही बोलू शकत नाही. श्रेष्ठींच्या आदेशानुसार होईल - अंबादासदानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना. 
बातम्या आणखी आहेत...