आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षिकेला ब्लॅकमेल करून तिच्यामार्फत घेतली लाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अपंग व मतिमंदांच्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरण्यापूर्वी छाननीसाठी ४० हजारांची लाच घेणाऱ्या जि. प. समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांना शुक्रवारी (१९ सप्टेंबर) दुपारी १.१५ वाजता अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संगीता पाटील-कोलते यांच्या एन-१२ येथील घरी त्यांच्याच मार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले. पाटील या सिल्लोडच्या अपंग निवासी विद्यालयात शिक्षिका आहेत. त्यांचे वेेतन समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या हाती असल्यामुळे सोनकवडे त्यांना ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा जबाब त्यांनी नोंदवला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार संस्थाचालक बादशहा पटेल यांनी चार विशेष शाळांसाठी अनुदान मंजूर व्हावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला होता. अखिल महाराष्ट्र ग्रामीण विकास मंडळ व अक्षर विकास शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांच्या माध्यमातून सिल्लोड, कन्नड आणि जटवाडा येथे चार विशेष शाळांना अनुदान हवे होते.

प्रत्येकी दहा हजार
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव छाननीसाठी समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांच्याकडे पाठवला होता. पटेल यांच्या चारही फाइल्स सोनकवडे यांच्याकडे प्रलंबित होत्या. १० सप्टेंबर रोजी त्यांनी पहिल्यांदा त्यांच्याशी संपर्क करून प्रत्येकी दहा हजार रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यानुसार लाचेची रक्कम स्वत: स्वीकारत नसून शिक्षिकेकडे जमा करण्यास सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसलेल्या पटेल यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी शिक्षिकेच्या घरी आणि जि. प. समाजकल्याण कार्यालयात एकाच वेळी दोन सापळे लावण्यात आले. लाच स्वीकारल्यानंतर पाटील यांनी ‘मॅडम’ना फोन करून रक्कम मिळाल्याचे सांगितले.

ते बोल आणि आताची करणी
आठ महिन्यांपूर्वी बोगस सौरदिवे वाटप करण्यात आल्याच्या प्रकारावर सर्वसाधारण सभेत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी बिल मंजूर कसे केले, असा सवाल सदस्यांनी केला होता. त्यावर सोनकवडे यांनी ताडकन सभापती चोरमलेंकडे हात दाखवत माझे सगळे व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगितले होते. वैजापूरला मुले नसूनही वसतिगृह सुरू असल्याचे दीपक राजपूत यांनी िनदर्शनास आणून दिले. त्यावरही त्यांनी असेच उत्तर दिले.