आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉर्ड हद्दींवरून सातारा-देवळाईत राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याआधीच वॉर्ड हद्दींवरून सातारा-देवळाईत राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. काँग्रेसच्या पदाधिका-यांशी संगनमत करून आरक्षण झाल्याचा आरोप युतीकडून होत असून अधिका-यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. राज्यात युतीची सत्ता असताना हा प्रकार कसा होऊ शकतो. आतापासूनच पराजय दिसत असल्याने युतीचे पदाधिकारी आरोप करत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
सोडत पद्धतीत अनेकांना धक्का बसला. त्यांनी ज्या वॉर्डात कामे केली ते आरक्षित झाले. त्यामुळे पहिला नगराध्यक्ष होण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. त्यांनी वॉर्ड रचनेवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात राऊत म्हणाले की, संपूर्ण वॉर्ड रचना २०११ च्या जनगणनेनुसार केली आहे. मुख्य देवळाई गाव, ख्वाजानगर, विठ्ठलनगर परिसरामध्ये जवळपास ३ हजार मतदार आहेत. अनुसूचित जातीची बहुसंख्या असूनही वॉर्ड सर्वसाधारण केल्याचा आरोप प्रशांत सातपुते यांनी केला आहे.
भौगोलिक रचनेचा अभ्यास न करताच हद्दी ठरवल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. माजी सरपंच यशवंत कदम म्हणाले की, काही मंडळींनी वॉर्ड रचनेत बदल केल्याने न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेचे राहुल बाहुले म्हणाले की, वॉर्ड रचना अभ्यासपूर्ण आणि नियमाला धरून झालेली नाही. फिरोज पटेल म्हणाले की, युतीच्या पदाधिका-यांना त्यांना हवे तसे वॉर्ड मिळाले नाही. त्यामुळे ते त्याचे खापर काँग्रेसवर फोडत आहेत.

वार्ड आरक्षण
वॉर्डनिहाय हद्दी निश्चित करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्याची जबाबदारी मुख्याधिकारी अशोक कायंदे व प्रशासक विजय राऊत यांच्यावर होती. गेल्या दीड महिन्यात त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी ४, मागास प्रवर्गासाठी ७ व सर्वसाधारण १४ असे वॉर्ड तयार करण्यात आले.