आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast In Coatings Company, Three Workers Injured

कोटिंग कंपनीतील भट्टीत स्फोट; तीन कामगार जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्णा कोटिंग कंपनीतील मेटल प्राेसेसिंग भट्टीत स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत भस्मसात झालेला कच्चा माल. छाया : धनंजय दारुंटे - Divya Marathi
कृष्णा कोटिंग कंपनीतील मेटल प्राेसेसिंग भट्टीत स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत भस्मसात झालेला कच्चा माल. छाया : धनंजय दारुंटे
वाळूज- मेटलप्रोसेसिंगच्या भट्टीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगार होरपळून जखमी झाले. यातील एका कंत्राटी कामगाराची प्रकृती गंभीर आहे. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील कृष्णा कोटिंग कंपनीत मंगळवारी मध्यरात्री घडली. अभिषेक सावलसिंग कुमार (२०), किरण फत्तेहसिंग राठोड (१९ रा.दोघेही दत्तनगर, रांजणगाव शेणपंुजी) आणि बबलू गुलाब पटेल (२३, रा.साजापूर, ता.औरंगाबाद) अशी जखमी कामगारांची नावे अाहेत. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.

वाळूज एमआयडीसीतील के-१५ सेक्टरमध्ये कृष्णा कोटिंग ही कंपनी आहे. या कंपनीत कोटिंगची कामे केली जातात. मंगळवारच्या रात्री १२.३० च्या सुमारास दुसऱ्या पाळीतील काम सुरू होते. कंपनीतील मेटल प्रोसेसिंगच्या कामासाठी एलपीजी गॅस वापरला जातो. नेहमीप्रमाणे भट्टीत मेटल प्रोसेसिंगचे काम सुरू होते. थोड्याच वेळात दुसरी पाळी संपणार असल्याने कामगार काम बंद करण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा अचानक भट्टीत स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की लगतच्या कच्च्या मालाने पेट घेतला. या वेळी काम करणारे अभिषेक कुमार, किरण राठोड बबलू पटेल हे तिन्ही कामगार होरपळून गंभीर जखमी झाले. बघता बघता आग फोफावू लागल्याने कंपनी व्यवस्थापनाने तातडीने वाळूज एमआयडीसीतील अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचा एक बंब तातडीने घटनास्थळी हजर झाला. एस. आर. गायकवाड, एस. डी. धुरंगे, एस. एस. अंभोरे, पी. एस. कोलते, एस. एस. वाखणकर यांच्या पथकाने दोन तास परिश्रम घेतल्यानंतर आग आटोक्यात आली. जखमी अभिषेक कुमार किरण राठोड यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. किरण राठोडवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला, तर बबलू पटेल यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात अाले आहे.

दुचाकीचे विविध सुटे भाग तसेच इतर पार्ट््सना कृष्णा कोटिंग कंपनीत कोटिंगचे काम केले जाते. मेटल प्रोसेसिंगच्या भट्टीवर शिवाजी शिंदे हे ऑपरेटर असून कंत्राटी कामगार अभिषेक कुमार, किरण राठोड, तर कायमस्वरूपी कामगार बबलू पटेल इतर एक असे पाच जण काम करतात. दुर्घटनेच्या वेळी तिघे जण भट्टीलगत असल्याने भाजले. इतर कामगार थोडे दूर असल्याने बचावले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

गॅस जास्त जमा झाल्याने घटना
कंपनीतीलमेटल प्रोसेसिंगच्या भट्टीसाठी एलपीजी गॅसचा वापर केला जातो. त्यात १५-१५ मिनिटांनी सोडलेला गॅस पूर्णपणे वापरला जाणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या भट्टीत जास्त गॅस जमा झाला असावा. कामगारांची सुटीची वेळ झाल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे भट्टीचे गेट उघडताच साचलेल्या गॅसने पेट घेतला. त्यामुळे आग भडकून कामगार जखमी झाले. अरविंदसिंग, व्यवस्थापक, कृष्णा कोटिंग कंपनी, वाळूज एमआयडीसी

स्फोट झालेल्या भट्टीसह आणखी पाच भट्ट्या आहेत. शिवाय कृष्णा कंपनीलगत प्राची इंडस्ट्रीज जाट मेटल या कंपन्यांत पेपर बॉक्स तयार करण्याचे काम चालते. अग्निशमन दल तत्काळ आले नसते, तर आग इतरत्र पसरून कोट्यवधींचे नुकसान झाले असते. एन.बी.खराडे,डायरेक्टर, कृष्णा कोटिंग कंपनी, वाळूज एमआयडीसी