आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast In Steel Furniture Company At Aurangabad, 4 Died And Five Injured

औरंगाबादमधील स्टील फर्निचर कारखान्यातील स्फोटात चार ठार, तर पाच जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जटवाडा भागात एका स्टील फर्निचरच्या कारखान्यात गॅस कटरने केमिकलचा डबा फोडत असताना झालेल्या भीषण स्फोटात तीन वर्षीय बालक व तीन कामगारांचा मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले. रविवारी सायंकाळी सात वाजता हर्सूल तलावाजवळील बशीरनगर भागात ही दुर्घटना घडली. जखमींना घाटीत दाखल करण्यात आले आहे.
जटवाडा रोडवर एस. एस. स्टील हा छोटा कारखाना आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील 9 कामगार येथे काम करतात. कुटुंबासह हे कामगार कारखान्याच्या परिसरातच राहतात. नेहमीप्रमाणे काम सुरू असताना माजेद खान हयात खान (40) गॅस कटरने केमिकलचा एक रिकामा डबा कापत असताना अचानक भीषण स्फोट झाला. यात माजेद खान याच्यासह शेख रफिक (30) यांचा जागीच मृत्यू झाला. शेख मुजफ्फर शेख अहमद (35) व तीनवर्षीय शेख शहजाद सिराज या दोघांचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. महंमद अकबर महंमद अजीज, हुजर रेहान, महंमद सिराज, महंमद फारूख हे चौघे जखमी झाले आहेत. स्फोटानंतर काय घडले आहे, हे पाहण्यासाठी आत जाण्याचे कुणाचे धाडस होत नव्हते.
पत्रे उडून गेले
स्फोटानंतर कारखान्याच्या भिंतीला तडे गेले आणि पत्रे उडून दूरवर पडले. कारखान्यातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले. स्फोट इतका भीषण होता की एक किलोमीटरचा परिसर हादरून गेला. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला सव्वासात वाजता कळली. पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. जखमींची घाटीत जाऊन विचारपूस केली.
कारखान्यात अंधार...
एस. एस. स्टील फर्निचर कारखान्यात वीज कनेक्शनही नाही. त्यामुळे पोलिसांना घटनेनंतर तपास आणि पंचनामा करताना अडचणी आल्या. खबरदारी म्हणून कारखाना परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बेगमपुरा पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आवाजाने कानठळ्या बसल्या
सायंकाळी सातच्या सुमारास मोठा आवाज आला. काय झाले हे थोडा वेळ कळले नाही. आम्ही तातडीने कारखान्याकडे धाव घेतली. पंधरा मिनिटांनंतर आम्ही आत जाऊन जखमींना बाहेर काढले.
शेख रफिक, रहिवासी, बशीरनगर.
नेमक्या कारणाचा शोध
गॅस कटरने केमिकलचा डबा कापताना स्फोट झाल्याचे दिसत आहे. पंचनाम्यानंतर खरे कारण स्पष्ट होईल. जखमी आणि मृत चंपारण भागातील आहेत. तेथील पोलिस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे.
संजयकुमार, पोलिस आयुक्त