आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: दुष्‍काळी मराठवाड्याच्‍या राजधानीत, पाणी... कुठे डोळ्यातून, कुठे रस्‍त्यांवर वाहते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घडले असे की, औरंगाबाद हायकोर्टाच्‍या खंडपीठाशेजारील एका चहाच्‍या टपरीजवळ उभा होतो. एक पांढ-या शुभ्र रंगाची चकचकीत कार तेथे थांबली. गोरागोमटा चालक कारमधून उतरला. टपरीवर आला. पाकीटातून करकरीत नोट काढून त्‍याने पाण्‍याच्‍या बाटलीची ऑर्डर सोडली. काऊंटरवरून पाणी व बाकीचे पैसे परत घेऊन महाशय कारच्‍या दिशेने निघाले. चालता चालताच त्‍यांनी दोन घोट पाणी पिले. नंतर अख्‍खी बाटली कारच्‍या समोरच्‍या काचेवर रिकामी केली. बाटलीच्‍या टोपणाने काच खरडली. पुन्‍हा त्‍यावर पाणी ओतलं. (काचेवर पाखरांनी घाण केली असावी.) अचानक या महाशयाकडे लोकांच्‍या नजरा वळल्‍या. काहींनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केलं, काहींनी राग. दोन चार जणांनी हळू आवाजातच पण कारचालकाला शिव्‍यांची लाखोली वाहिली. रिकामी बाटली कच-यात फेकून तो निघून गेला. तीन वर्षांपासून दुष्‍काळ भोगणा-या मराठवाड्याच्‍या राजधानीत दररोज डोळ्यात पाणी आणणारे असे कैक प्रसंग दिसतात..
सलग तीन वर्षांपासून मराठवाडा दुष्‍काळाशी दोन हात करतोय, त्‍यामुळे मराठवाड्यातील शेतकरी, कष्‍टक-यांना पाणी बचतीचे सल्‍ले देण्‍यात फार अर्थ नाही. हंडाभर पाण्‍यासाठी उन्हातान्हात पायपीट करून घाम गाळणा-या कष्‍ट करणा-यांना पाणीबचत चांगलीच ठाऊक आहे. उलट घरातील महापालिकेचा नळ बंद होईपर्यंत वाहनं धुणा-या, रस्‍ते धुणा-यांना किंवा 20 रूपयात पाण्‍याची बाटली घेऊन, हवी तशी नासाडी करणा-यांना जलसाक्षरतेची विशेष गरज आहे. औरंगाबाद शहरातील काही वसाहतींमधले असे निरीक्षण आहे. शहरालगतच्‍या सातारा परिसरातच दररोज रहिवाश्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी बारोमास पिण्‍याचे पाणी विकत घ्‍यावे लागते. सध्‍या परीक्षेचा कालावधी आहे. अभ्‍यासाऐवजी युवक युवती पाण्‍याच्‍या शोधात असतात. दुसरीकडे शहरातील काही वसाहती अशा आहेत की, तेथील पाण्‍याने वाहणारे रस्‍ते नि दारासमोरच्‍या चकाचक गाड्या पाहून येथे नळ येऊन गेल्‍याचे कळते. औरंगाबाद व जालना शहरासह येथील उद्योगांना पाणी पुरवणा-या जायकवाडी धरणातील पाण्‍याचा साठा सोमवारी सायंकाळी पूर्ण संपल्‍याची नोंद आहे आहे. त्‍यामुळे येणा-या दिवसात मृतसाठ्यातून पाण्‍याचा उपसा करावा लागणार आहे. विहिरींनी तळ गाठलाय, धरणांमधील पाण्‍याचा साठा कमी होतोय. एवढी भयानक परिस्‍थिती असताना औरंगाबादेत पाण्‍याने रस्‍ते कसे धुतल्‍या जातात? येथील नळांना तोट्या नाहीत का?, पाण्‍याची नासाडी करणा-यांना कारवाईचा धाक नाही का? असे अनेक प्रश्‍न समोर येतात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, शहरात कसा होतो पाण्‍याचा अपव्‍यय, मराठवाड्यात काय आहे दुष्‍काळाची स्‍थिती.. किती आहेत टँकर..
बातम्या आणखी आहेत...