आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्व रक्तपेढय़ा होणार ऑनलाइन; रक्त मिळणे होईल सोयीचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशातील सर्व रक्तपेढय़ा ऑनलाइन होणार असून एका क्लिकवर कुठल्याही राज्यातील-शहरातील उपलब्ध रक्त व रक्तघटकांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर ‘नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन’मार्फत (नॅको) तयार झाले आहे आणि ओरिसा राज्यात पायलट प्रकल्प सुरूही झाला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशातील रक्तपेढय़ा टप्प्याटप्प्याने ऑनलाइन होतील. परिणामी, रुग्णांना निगेटिव्ह रक्तासह कुठलेही रक्त किंवा रक्तघटक मिळणे अधिकाधिक सोयीचे होणार आहे.

‘नॅको’च्या राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी विनिता श्रीवास्तव (दिल्ली) यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. औरंगाबाद शहरातील रक्तपेढय़ांना श्रीवास्तव यांनी गुरुवारी (27 जून) भेट देऊन पाहणी केली. त्यानिमित्त त्यांनी ‘नॅको’च्या विविध उपक्रमांविषयी सांगितले. देशातील रक्तविषयक तसेच रक्तपेढय़ांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारच्या अधिपत्याखालील ‘नॅको’ संघटना पुढाकार घेते. कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वेळी सुरक्षित रक्त किंवा रक्तघटक मिळावेत, हा ‘नॅको’चा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठीच हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून तसे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. ओरिसामध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ यशस्वी झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येऊन संपूर्ण देशातील रक्तपेढय़ा ऑनलाइन होतील. यासाठी नेमका किती कालावधी लागेल, याविषयी आत्ता सांगता येणार नाही; परंतु एकदा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास देशातील रक्तपेढय़ा ऑनलाइन होण्यास वेळ लागणार नाही, असे र्शीवास्तव यांनी सांगितले. या प्रकल्पासाठीच रक्तपेढय़ांची माहिती संकलन करण्यासह रक्तपेढय़ांची सांगड घालण्याचा प्रयत्न होत आहे.

सर्व रक्तपेढय़ा ऑनलाइन झाल्यास कुठल्या शहरात रक्त व रक्तघटकांचा एकूण साठा किती आहे, कुठल्या रक्तपेढीमध्ये किती पॉझिटिव्ह-निगेटिव्ह रक्त उपलब्ध आहे, याची एका क्लिकवर माहिती मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधून कमीतकमी वेळेत व धावपळीत रक्तघटक मिळविणे सोयीचे होणार आहे. आपत्कालीन प्रसंगात दुसर्‍या शहरातून रक्तघटक मिळवून रुग्णाचा जीव वाचविता येईल. कमीत कमी विलंबात रक्त मिळाल्यास अधिकाधिक रुग्णांचा जीव वाचू शकतो, असेही र्शीवास्तव म्हणाल्या.

घाटीच्या रक्तपेढीला मदतीचा हात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीतील महत्वाची उपकरणे जेव्हा कंडम होतील, तेव्हा त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे लवकरात लवकर उपकरणे-साहित्य मिळावे, यासाठी ‘नॅको’ पुढाकार घेईल. राज्य सरकारकडे पाठपुराव्याचेही काम करेल. रक्तसंकलनाच्या ब्लडबॅगांसह इतर साहित्य देण्याचे कामही ‘नॅको’ करेल, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घाटीच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन बिंदू यांनी, ब्लडबॅगा आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत न देता थेट द्याव्यात, अशी सूचना श्रीवास्तव यांच्याकडे केली आणि श्रीवास्तव यांनी ती मान्य केली.

पंजाबमधील 17 रक्तपेढय़ा बंद
पंजाबातील काही रक्तपेढय़ांमध्ये वेगवेगळे गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘नॅको’च्या वतीने विशिष्ट प्रकारचे ‘स्टिंग’ करून खात्री करण्यात आली. त्यानंतर त्या राज्यातील शासकीय यंत्रणेला अधिकृतरीत्या कळवण्यात आले. शासकीय यंत्रणेने तपासणी करून तशा रक्तपेढय़ांचे परवाने मागच्या वर्षी रद्द केले. गैरप्रकार करणार्‍या काही रक्तपेढय़ा कारवाईच्या आधीच स्वत:हून बंद झाल्या. ‘नॅको’ने कठोर पावले उचलल्यामुळेच पंजाबमधील एकूण 17, तर अजून एका राज्यातील पाच रक्तपेढय़ा बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील रक्तपेढय़ा ऑनलाइन झाल्यास 70 हजारांमध्ये एखाद्याला असणारा ‘बॉम्बे ब्लडग्रुप’सारखा दुर्मिळ रक्तघटक, विविध निगेटिव्ह रक्तघटक सहजरीत्या मिळवण्यासाठी मोठी मदत होईल. त्याचवेळी उत्तरखंडसारख्या आपत्कालीन घटनांमध्येही अशी ऑनलाइन सेवा वरदान ठरेल. अशा स्थितीत देशातल्या कुठल्याही भागातून रक्त उपलब्ध करणे शक्य होईल. डॉ. महेंद्रसिंह चौहान, दत्ताजी भाले रक्तपेढीप्रमुख.

‘इंडियन सोसायटी फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन अँड इम्युनोहिमॅटॉलॉजी’च्या (आयएसबीटीआय) वतीने देशभरातील रक्तदात्यांची यादी ब्रेव्होब्लडडोनर डॉटकॉम’ या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. डॉ. दिलीप वाणी, राज्य अध्यक्ष (पुणे)