आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरा दिवस पुरेल एवढे रक्त एकाच दिवसात झाले संकलित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेत दररोज ५०० पिशवी रक्ताची गरज असते. आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (१२ डिसेंबर) देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात महारक्तदान शिबिर झाले. त्यात औरंगाबाद शहराला ११ दिवस पुरेल एवढे म्हणजे ५५०० पिशव्या रक्त संकलित झाले. औरंगाबादच नव्हे, तर मराठवाड्यात रक्तदानाचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या शिबिराचे एखाद्या इव्हेंटसारखे नियोजन महिन्याभरापूर्वी झाले होते. दात्यांची नोंदणी फेसबुक, व्हॉट्सअॅपवर करण्यात आली. शिवाय ट्विटरवरून संदेशही फिरवण्यात आले.

सकाळी ७.३० ला शिबिराचे उद्घाटन होताच तरुण-तरुणींचे ताफे उत्साहात रक्तदानासाठी आले. एनसीसी, एनएसएसची पथके तर ढोल-ताशा आणि बँडच्या गजरातच आली होती. किमान हजार पिशव्यांच्या संकलनाचे उद्दिष्ट चव्हाण यांनी जाहीर केले होतेच. त्यासाठी लाखांवर एसएमएसही पाठवण्यात आले. शहरातील ३०-४० महाविद्यालयांतील एनसीसी, एनएसएस आणि क्रीडा विभागप्रमुखांच्या बैठकाही झाल्या. महिला मंडळे, स्वयंसेवी संस्था, क्रीडा संघटनांशिवाय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थांना आवाहन करण्यात आले होते. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० पिशव्या रक्त संकलित झाले होते.

यांनी केले रक्त संकलन
दत्ताजीभाले, एमजीएम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लोकमान्य, अमृता, धूत, लायन्स, अर्पण, बुलडाणा, जनकल्याण जालना.

यांची होती उपस्थिती
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य पंडित हर्षे यांच्या हस्ते शिबिराचे उद््घाटन झाले. या वेळी बी. बी. शिंदे, आमदार चव्हाण, अॅड. मोहन सावंत, त्र्यंबक पाथ्रीकर, प्रदीप चव्हाण, डॉ. अविनाश येळीकर, नितीन थोरात, विश्वास पाटील, अभिजित अवरगावकर, प्रशासकीय अधिकारी एफ. जी. माळी, उपप्रशासकीय अधिकारी डॉ. पी. आर. थोटे, उपप्राचार्य अशोक तेजनकर, माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ, विनोद पाटील यांची उपस्थिती होती.

साहेबांना यापेक्षा कोणत्या शुभेच्छा देणार?
^मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना पवार साहेबांना शुभेच्छा द्यायच्या कशा, असा प्रश्न आम्हाला पडलाच नाही. कारण रक्तदान करून शुभेच्छा देण्याचे आम्ही नियोजन केले होते. यापुढे प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या नेत्याला याच पद्धतीने शुभेच्छा देणार आहोत. यंदा सर्वांच्या मदतीने प्रस्थापित केलेला विक्रम पुढील वर्षी मोडू. - सतीश चव्हाण, आमदार,संयोजक.

उपमा, जेवणही
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या या शिबिरात रक्तदानापूर्वी उपमा, तर रक्तदानानंतर चहा-बिस्किटाची व्यवस्था होती. शरद पवार यांच्या विचारांचा प्रचार करणारे वृत्तपट रवींद्रनाथ टागोर सभागृहात दाखवले जात होते.

१५ तांत्रिक
२०० खाटा
२० बाह्यव्यवस्था
०८ रक्तदानकक्ष
१० मंडप
११ रक्तपेढ्या
५० कक्षव्यवस्थापन
८० विद्यार्थीकार्यकर्ते
४० नोंदणी
२०० स्वयंसेवक
बातम्या आणखी आहेत...