आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्डाच्या परिक्षेत 'सर, प्लीज मला पास करा' लिहिणाऱ्यांची होणार चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- “देवातुझ्या पाया पडतो, मला पास कर, मी मंदिरात पेढा ठेवीन, सर, प्लीज मला पास करा, परिस्थिती हलाखीची आहे, यापुढे चांगला अभ्यास करीन, मात्र यंदा पास करा,’ अशा शब्दांत भावनिक साद घालत उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांची बाेर्डात चौकशी करण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली. 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यातच संपल्या होत्या. आता निकालाचे वेध लागले आहेत. निकाल तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. असे असले तरी परीक्षेच्या काळात गैरप्रकार आढळून आलेले केंद्र, केंद्रप्रमुख, केंद्र सहायक तसेच कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची तदर्थ समितीसमोर सुनावणी आणि बोर्ड अधिकाऱ्यांच्या समितीसमोर चौकशी सुरू आहे. बोर्डाच्या नियमानुसार कारवाईदेखील करण्यात येणार आहे. 

उत्तरपत्रिका तपासणीदरम्यान दरवर्षी काही गैरप्रकार समोर येतात. त्यातलाच एक भाग म्हणजे उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लेखन करणे, खाणाखुणा करणे, चिन्हांचा वापर करणे आदी बाबींचा समावेश गैरप्रकारांमध्ये केला जातो. यंदाही उत्तरपत्रिकेच्या तपासणीत असे आक्षेपार्ह लेखन आढळून आले आहे. ज्यात कुणी भावनिक साद घालत आहे तर कुणी देवाच्या, आई-वडिलांच्या शपथा देत पास करण्यासाठी विनवणी केल्याचे आढळून आले आहे. अशा विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या विभागीय सचिव वंदना वाहूळ यांनी सांगितले. 

शाळांना सूचना दिल्या 
परीक्षे दरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांबरोबरच परीक्षेनंतरचेही गैरप्रकार चौकशीसाठी घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये आक्षेपार्ह लेखन करू नये, अशा सूचनाही शाळांना देण्यात येतात. परंतु तरीदेखील असे प्रकार घडतात. अशा सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. 
- शिशिर घोनमोडे, विभागीय अध्यक्ष, एसएससी बोर्ड 
बातम्या आणखी आहेत...