आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद फ्लॅटमध्ये सापडला प्राध्यापिकेचा मृतदेह, सिटी चौकातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ज्युबिली पार्क येथील नवखंडा महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या मॉडर्न डीएड महाविद्यालयातील प्राध्यापिका लुभना मसरत शेख महंमद जुनैद (४४, रा. अमोदी कॉम्प्लेक्स, सिटी चौक) यांचा घरातच बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह आढळून आला. दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. शवविच्छेदन विभागाने मृत्यूचे कारण राखीव ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

महंमद जुनैद हे बॉम्बे मर्कंटाइल बँकेच्या खुलताबाद शाखेत अधिकारी आहेत. ते खुलताबादेत राहत असल्यामुळे लुभना अमोदी कॉम्प्लेक्समध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा बऱ्याच दिवसांपासून त्रास होता. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास महंमद जुनैद हे कॉम्प्लेक्समध्ये गेले तेव्हा फ्लॅटमधून त्यांना दुर्गंधी येऊ लागली. लुभना या दरवाजा उघडत नव्हत्या. त्यामुळे जुनैद यांना संशय आल्याने त्यांनी थेट सिटी चौक पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. यानंतर उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या १३ नंबरच्या फ्लॅटकडे धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत शिरताच त्यांना लुभना यांचा मृतदेह आढळला. त्यांचा मृतदेह घाटीत उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. सायंकाळी उत्तरीय तपासणी झाली. लुभना मसरत यांच्या अंगावर जखम किंवा गळ्यावर कसलेही व्रण नसल्याचा अहवाल देत व्हिसेरा राखून ठेवला आहे. शेख जुनैद महंमद यांनी लुभना मसरत यांच्याशी सात वर्षांपूर्वी दुसरे लग्न केलेले होते. मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. शारीरिक व्याधीमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, व्हिसेरा तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. पुढील तपास सहायक फौजदार हरीश खटावकर हे करत आहेत. 

दोन दिवसांपासून पडून होता मृतदेह
मागील दोन दिवसांपासून हा मृतदेह घरात पडून असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास अधिकारी हरीश खटावकर यांनी घराची झडती घेतली असता घरात कुठल्याही प्रकारची चिठ्ठी किंवा इतर पुरावे सापडले नाहीत. लुभना मसरत यांचा महाविद्यालयीन प्रशासनासोबत गेल्या काही वर्षांपासून वाद असल्याचीही चर्चा आहे. 
बातम्या आणखी आहेत...