आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोतया महिला फौजदाराचा लष्करी जवानांना गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिस उपनिरीक्षक असल्याच्या थापा मारून तोतयेगिरी करणार्‍या तरुणीला सिडको पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले. कुपवाडा, पंजाब येथे लष्कराची सेवा करणार्‍या दोन जवानांना तिने एक लाख 10 हजारांना लुटले. सरिता रामराव कुलकर्णी (22, रा. कळगाव, ता. पूर्णा) असे तिचे नाव आहे.

सरिताचे पोलिस विभागात भरती होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर तिने अनेकांना लुटल्याचे उघड झाले आहे. परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली आहे. सध्या एन- 12 (हडको) छत्रपतीनगर येथे भाड्याच्या खोलीत ती राहत होती. गंगापूर तालुक्यातील नेहरी येथील रहिवासी आणि काश्मीरमध्ये लष्करात असलेल्या भीमराव वसंत लहाने यांच्याकडून तिने आईच्या आजारपणासाठी पैसे घेतले. सुट्यांमध्ये आलेले भीमराव यांच्याशी तिची ओळख लष्करातीलच एक जवान संतोष चाटे यांच्यामुळे झाली. दोघांनाही तिने आपण पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या पत्नीचे वाहनचालक असल्याची थाप मारली. 2 फेब्रुवारीला सरिताने आपल्या आईची तब्येत खराब असल्याचे सांगून 20 हजार रुपये घेतले. पुढे रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगत तिने आणखी 90 हजार रुपयांना गंडा घातला आणि मोबाइल घेणेच बंद केले. त्यावरून त्यांना शंका आली अन् गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्याकडे लेखी तक्रार दिली. तिच्या घरात महिला पोलिस कर्मचार्‍याचा अस्सल गणवेश, बनावट नेमप्लेट आढळली.

अशी सापडली जाळ्यात
पोलिस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेतील रेखा लक्ष्मण अवसरे या महिला पोलिसाच्या संपर्कात सरिता होती. आज ती रेखाकडे येऊन बसताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार गोरख चव्हाण यांनी दुपारी साडेबारा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयातून तिला ताब्यात घेतले असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक शिल्पा लंबे या पुढील तपास करत आहेत.