आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकोरिया ठाम, म्हणाले माफी मागणार नाही !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एप्रिल महिन्यातच प्रशासनाने रस्त्यांच्या कामांसाठी प्रभागनिहाय ५० लाख रुपयांच्या कामांचे टेंडर काढण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता, पण महापौरांनी त्या वेळी विरोध केला नसता तर आज कामे झाली असती असे सांगत खड्ड्यांची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर ढकलत आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आज सभागृह सोडून जाण्याच्या प्रकाराबाबत माफी मागण्यास सपशेल नकार दिला. आयुक्तांच्या या ताठर भूमिकेमुळे आगामी काळात संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट झाले.

सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना उद्देशून ‘गेंड्याच्या कातडीचे’ हे शब्द नगरसेवकांनी वापरल्यावर संतापलेल्या आयुक्त बकोरियांनी सर्व अधिकाऱ्यांना हात दाखवून ‘चला रे’ असा इशारा करीत सर्व अधिकाऱ्यांसह सर्वसाधारण सभा सोडली. या नंतर सभागृहात आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. या साऱ्या प्रकारासंदर्भात आयुक्त बकोरिया म्हणाले की, सभागृहात जे अशोभनीय, असांसदीय शब्द वापरले गेले त्याचा मी निषेध करतो. झाल्या प्रकाराबाबत मात्र मी माफी मागणार नाही.शहरात खड्डे खूप आहेत, त्या कामाला उशीरही झाला आहे, हे मान्य करतो पण यात आमची काहीच चूक नाही.

आम्ही प्रस्ताव दिला होता : एप्रिल महिन्यात प्रशासनाने प्रभागनिहाय रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. आम्ही तसा प्रस्तावही तयार केला होता. पण महापौरांनी त्याला विरोध केला डांबरीकरणाचे काम कराल तर कारवाई करू असा इशारा दिल्यावर आम्ही तो प्रस्ताव मागे घेतला. तसे झाले नसते तर आज रस्त्यांची कामे झाली असती. त्यानंतरही आम्ही मुरुम जीएसबीचा वापर करून खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढले आहेत. पण त्याला प्रतिसादच मिळत नाही. तरीपण आता पावसाळा संपला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही ३० सप्टेंबरपर्यंत शहरातील खड्डे बुजवणार आहोत. सध्या तातडीचे काम असल्याने आपण आपल्या विशेषाधिकारातून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.

डांबरप्लांट किचकटच : डांबर प्लांटचे काय झाले यावर ते म्हणाले की, डांबर प्लांट सुरू करण्याची प्रक्रिया खूप लांबलचक आहे. अनेक परवानग्या आहेत. कर्मचारी लागणार आहेत. त्यामुळे त्याऐवजी सध्या जेसीबी, टिप्पर रोड रोलर खरेदी करण्यासाठी कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. सध्या हे काम टेंडर प्रक्रियेत आहे.
बातम्या आणखी आहेत...