आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- अभिनेता सलमान खान याच्या बीइंग ह्युमन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी दोन हजार लिटर क्षमतेच्या 2250 टाक्या देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात गुरुवारी (9 मे) 53 टाक्या औरंगाबाद जिल्ह्यासाठी मिळाल्या. जिल्ह्याला 250 टाक्या दिल्या जाणार आहेत. त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
संस्थेच्या वतीने गेल्याच आठवड्यात टाक्या देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार संस्थेने बीडसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत शिस्तबद्धपणे टाक्या पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. या टाक्या प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेच्या असून एका गावात दोनपेक्षा अधिक टाक्या दिल्या जाणार असून त्या महानगरपालिका, नगर परिषद तसेच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिल्या जात आहेत. आमखास मैदानावर या टाक्या उतरवून घेण्यात आल्या. गरज भासल्यास जाहीर केलेल्या टाक्यांच्या संख्येत वाढ करण्याची तयारी संस्थेने दर्शवली आहे.
आतापर्यंत मराठवाड्यात पाच हजारांवर टाक्यांचे वाटप : विविध संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केल्याने आतापर्यंत मराठवाड्यात तब्बल 5 हजारांवर टाक्यांचे वाटप करण्यात आले आहे. यात ए टू झेड ही औरंगाबाद येथील संस्था, जालन्यातील व्यापारी, जैन संघटना यांचा समावेश आहे.
प्रसिद्धी नको : दुष्काळात टाक्यांची मदत करणार असल्याबद्दल प्रसिद्धी नको, असे ‘बीइंग ह्युमन’ या संस्थेच्या वतीने प्रशासनाला सांगण्यात आले होते. प्रसिद्धीसाठी ही मदत केली जात नाही, त्यामुळे या टाक्यांच्या वाटपाला प्रसिद्धी दिली जाऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.