आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bonsai Garden On Terese At Aurangabad, Dr. Vishwas Joshi's Home

गच्चीवर फुलले अनोखे बोन्साय गार्डन; तयार केले ३०० बोन्साय वृक्ष, ४० वर्षांपासून छंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बोन्साय म्हटले की प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल जागृत होते. मोठमोठ्या वृक्षांची ही वंशावळ अगदी छोट्या कुंडीत ऐटीत उभी असलेली पाहताना मनस्वी आनंदही होतो. मग हे डौलदार वृक्ष आपल्या दारात, घरातही असावेसे वाटतात. यातूनच छंद जोपासला जातो. बीड शहरातील ज्येष्ठ डॉ. विश्वास जोशी यांनी असाच बोन्सायचा छंद जोपासला आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून डॉ. जोशी यांनी हा छंद जोपासून गच्चीवर तीनशेहून अधिक बोन्साय वृक्ष सांभाळले आहेत. याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन आयुर्वेदिक वनस्पतींच्या बोन्सायचाही यात समावेश आहे. डॉ. जोशी यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महावदि्यालयात १९७३ मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीत असताना त्यांची वृक्षांशी मैत्री जडली. नंतरच्या काळात बदली झाली तरी वृक्षवल्लींशी जोडले गेलेले नाते तुटले नाही. बोन्साय गार्डन पाहण्यासाठी देशवदिेशातून मित्र : डॉ. जोशी यांचे बोन्साय टेरेस गार्डन पाहण्यासाठी देश-विदेशातून त्यांचे मित्र येतात. वयाची साठी ओलांडलेले जोशी आपल्या उत्साहाचे श्रेय या वृक्षांच्या संगतीला आणि संगीताला देतात. त्यांना व्हायोलिन, गिटार, माऊथ ऑर्गन, हर्मोनियम वाजवण्याचाही छंद आहे. त्यांचे जावई, सुना, नातवंडांनाही या अनोख्या बागेची ओढ असते. सगळे एकत्र आले की ते मिळून या अनोख्या बागेत श्रमदान करतात. सुटी मजेत घालवतात.

उगम भारतातूनच... : बोन्साय वनस्पतीचा उगम जपानमध्ये झाल्याचे मानले जाते. यासोबतच सहाव्या शतकात चिनी संस्कृतीमध्येही याचे पुरावे आढळतात. जपानी परंपरेत बोन म्हणजे छोटे पसरट भांडे. यात लावलेले झाड म्हणजे बोनसाय, असा एक तर्क आहे. १९ व्या शतकाच्या अखेरीस खऱ्या अर्थाने बोनसायचा जगभर प्रसार झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाला या बोनसाय संस्कृतीची खरी ओळख झाली. आधुनिक काळात हा इतिहास मानला जात असला तरी डॉ. जोशी यांच्या मते हजारो वर्षांपूर्वी भारतातील ऋषी-मुनींनी आयुर्वेदेतातील दुर्मिळ वनस्पतींची जपणूक व्हावी म्हणून बोन्साय संकल्पना राबवली. जपानी लोकांनी ही संकल्पना घराच्या अंगणातून ड्रॉईंग रूममध्ये आणली, असे डॉ. जोशी सांगतात.
अशी झाली सुरुवात
डॉ. जोशी यांनी पुण्यातून एक बोन्साय झाड एक हजार रुपयात विकत घेतले. त्यावर सखोल अभ्यास केला. बोन्सायचे तंत्र शिकून घेतले. यातून वड, पिंपळ या भारतीय संस्कृतीत पूजनीय वृक्षांचे बोन्साय तयार करण्यात त्यांना यश आले. हा छंद असाच वाढत गेला.

गच्चीवर असे फोफावले बोन्साय जंगल
डॉ. जोशी यांच्या गच्चीवर गेले की बोन्सायच्या अनोख्या जंगलात आपण प्रवेश करतो. कुंडीत लावलेले वड, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर, नारळ, अशोक, खैर, नांदुरकी या बड्या वृक्षांची रिडक्शन कॉपी पाहताना गंमत वाटते. या विलोभनीय जंगलात आपण हरखून जातो.

आयुर्वेदिक वनस्पतींचाही ठेवा
या मोठ्या वृक्षांच्या बोन्सायसोबत पिंपळी, शतावरी, कवठ, डाळिंब, मोसंबी, संत्रा, लिंबू, सायकस, गोरख चिंच अशी बोन्साय प्लाटिकच्या पसरट जारमध्ये लावलेली दिसतात. ही झाडे लोखंडी जाळ्यांचे कप्पे करून ठेवलेली आहेत. ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून हिरव्या जाळीचे शेडही तयार करण्यात आले आहे.