आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्‍यांना पैशापुढे आनंदाचा विसर- अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-आजकाल प्रत्येकाला पैसा मिळवण्याचा ध्यास लागला आहे. पैसा मिळवण्यासाठी सारेच जण धावत सुटले आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारतीय मध्यमवर्गाच्या जीवनशैलीबद्दल मुक्तचिंतन करत निरीक्षण नोंदवले. पैशाच्या मागे धावत सुटताना जीवनातील आनंद कशात आहे, याचाच विसर सार्‍यांना पडला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्यावर ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांनी लिहिलेल्या ‘न्या. बी.एन.’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (एक मार्च) अण्णांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी त्यांचे विचार मुक्तपणे मांडले. संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी झालेल्या या सोहळ्यास उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अँड सतीश तळेकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष के. जी. भोसले, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर, अँड. सुखदेव शेळके, अँड. वासुदेवराव साळुंके, अँड. नितीन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे होते.
ते म्हणाले की, समाजातील नैतिकता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. कोणत्याही स्तरावर संवेदनशीलता तर पाहण्यासच मिळत नाही ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकाचे उद्दिष्ट केवळ पैसा कमावणे हेच झाले आहे. घरात एसी असणार्‍यांना झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत आहेत. रिकाम्या हाताने आपण या जगात आलो आणि रिकाम्या हातानेच जगातून जाणार आहोत, याची जाणीवच कुणाला नाही. हे माझे, ते माझे आणि तुझे तेही माझेच, अशी प्रवृत्ती वाढत चालली आहे. बी. एन. देशमुख यांचे कौतुक करताना अण्णा म्हणाले, बी.एन. यांनी प्रसिद्धी, मानपान नको, असेच व्रत आयुष्यभर अंगीकारले. निष्कलंक चारित्र्य, शुद्ध आचार-विचार आणि कायम समाजाचा विचार करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या वेळी न्या. के. यू. चांदीवाल, न्या. अभय ठिपसे, माजी न्या. एस. बी. देशमुख यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अँड. शेळके यांनी केले.