आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: लाचखोर कामावर, व्यवस्थेला ठेंगा; एसीबीच्या कारवाईनंतरही भ्रष्‍ट मोकाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून लोकपालसारखे कडक कायदे आणण्यापर्यंत जनतेला विजय मिळाला; परंतु प्रशासकीय यंत्रणा आणि एकूणच बरबटलेली व्यवस्था यामुळे भ्रष्टाचार्‍यांचे फावते. गहाण ठेवलेली नीतिमत्ता, प्रशासकीय दिरंगाई आणि कायद्यातील पळवाटा यामुळे भ्रष्ट मोकाट आहेत. रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीने किरण इंडस्ट्रीजला कर भरण्याबाबत नोटिसा बजावल्या. त्या सानप यांनी दाबून ठेवल्या. परिणामी ग्रामपंचायतीने थेट कारवाईचा बडगा उचलत भाडेकरू जैन यांच्या मालकीच्या मोक्षा गॅस इंडस्ट्रीजवर कारवाई करून 114 सिलिंडर जप्त केले. त्यानंतर स्वत: कर भरण्यासाठी तयारी जैन यांनी दाखवली. ग्रामपंचायतीने 3 लाख 20 हजारांचा धनादेशही घेतला, मात्र माल सोडण्यास ग्रामसेवक सतीश चव्हाण आणि लिपिक रमेश जाधव यांनी विरोध केला. माल सोडवण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. पैसे का द्यावेत म्हणून जैन यांनी थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला.


सापळ्यात दोघे अलगद अडकले
जैन यांनी 31 जानेवारी 2013 रोजी पहिल्या टप्प्यात 70 हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. दुपारी 12 वाजता पैसे घेऊन या आणि माल उचलून घ्या, असे ग्रामसेवक चव्हाण यांनी जैन यांना सांगितले. पैसे मिळणार हे ग्रामसेवक चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी 4 वाजता जैन यांनी पावडर लावलेले 70 हजारांचे बंडल जाधव यांच्या हातात ग्रामसेवक चव्हाण यांच्या समक्ष दिले. याच वेळी हे दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगद पकडले गेले.


तिसर्‍याच दिवशी दोघेही कामावर
लाचलुचपत विभागाने पकडलेल्या व्यक्तीची माहिती 12 तासांच्या आत संबंधित विभागाला द्यायची असते. त्यानंतर तो विभाग त्या लाचखोर कर्मचार्‍याला तत्काळ कामावरून कमी करतो व त्याच्याकडील सर्व अधिकार काढून घेण्यात येतात, मात्र वाळूजच्या या प्रकरणात हे दोन आरोपी तिसर्‍याच दिवशी कामावर रुजू झाले. या शिवाय जिल्हा परिषदेतील एक तक्रार डीबी स्टारकडे आली. चमूने स्टिंग करून पर्दाफाश केला.

डीबी स्टींग ऑपरेशन
चमूने दोन्ही ठिकाणी पाहणी करून या लाचखोरांना काम करतानाच कॅमेर्‍यात टिपले. यात मोक्षा इंडस्ट्रीजचे जैन यांच्याकडून 31 जानेवारी 2013 रोजी 70 हजारांची लाच घेणारे ग्रामसेवक चव्हाण आणि लिपिक जाधव यांचा समावेश आहे, तर जिल्हा परिषदेत प्रशासकीय थकित वेतन काढण्यासाठी 14 जानेवारी रोजी 3 हजारांची लाच स्वीकारणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी रवी जोशी कामावर असलेले उघड झाले.
प्रकरण 1
रांजणगाव येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक आहे का, अशी विचारणा केली तेव्हा साहेब सुटीवर आहेत. काही काम असल्यास जाधव साहेबांना भेटा, असे सांगण्यात आले. चमूने ग्रामपंचायतीच्या सर्वात आत असलेल्या रूममध्ये प्रवेश केला तेव्हा रमेश जाधव हे फायली चाळत असल्याचे समोर आले. सोबत सरपंच कांताबाई जाधव यांचे पती जावध हे सिगारेट ओढत बसलेलेही आढळले.
वेळ दुपारी 2 वाजता
प्रतिनिधी- आम्हाला काही कंपन्यांची कराविषयीची माहिती हवी आहे..
जाधव- सांगा काय माहिती पाहिजे. (चमूने चार-पाच कंपन्यांची नावे सांगत माहिती द्या असे सांगितले.)
जावध-हो, सगळी देतो. (कपाटातील फायली उचकून इत्थंभूत माहिती दिली. प्रशासकीय कामकाजात हव्या असलेल्या खुर्चीवर बसून ही माहिती जाधव देत होते. कपाटाच्या सर्व किल्ल्याही त्यांच्याकडेच होत्या. लाचखोर असूनही ते नित्याने काम करीत होते हे यावरून उघड होते.)
.प्रशासकीय अधिकार्‍यांची जबाबदारी
एखादा कर्मचारी रंगेहाथ पकडला जातो, त्याच वेळी त्याचे सर्व अधिकार काढले जातात. असा नियमच आहे; परंतु प्रशासकीय कारवाई करताना काही मुद्दय़ांचाही विचार केला जातो. आरोपी किती काळ एसीबीच्या ताब्यात होता. त्यानुसार त्या व्यक्तीवर कारवाई होते. यासाठी कागदपत्रांच्या खेळात होणारा विलंब लाचखोरांच्या पथ्यावर पडतो. मात्र, याचा कुठलाही विचार प्रशासकीय अधिकार्‍यांनी न करता नैतिकतेच्या दृष्टीने लाचखोरांना काम करण्यापासून रोखणे हाच खरा मुद्दा आहे.
अँड. भाऊसाहेब जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ


थेट सवाल
कांताबाई जाधव,
सरपंच, रांजणगाव
आपल्या कार्यालयातील ग्रामसेवक आणि लिपिक लाच घेताना पकडले गेले..
-हो, सत्य आहे. त्यांना असे कृत्य करू नये म्हणून अगोदरच समज दिली होती.
असे असताना दोघेही कामावर आहेत?
नाही, ग्रामसेवक चव्हाण सुटीवर आहेत.
जाधव मात्र काम करीत आहेत..
तसे काहीही नाही. जाधव यांच्यावर पुढील कारवाई रिपोर्ट आल्यानंतर होईल. कुठलेही काम आम्ही त्यांच्याकडून करून घेत नाही. तुम्ही कशाला त्यांच्या मागे लागलात?

थेट सवाल
के. बी. जाधव,
कनिष्ठ लिपिक, पंचायत विभाग, जि. प.
पंचायत समितीचे ग्रामसेवक व लिपिकाला लाचलुचपत विभागाने पकडले, त्यांचे काय झाले?
-त्यांना कामावरून कमी केले आहे. सध्या ते कामावर नाहीत. एसीबीचा फायनल रिपोर्ट आल्यानंतर निलंबनाची कारवाई करायची की नाही हे साहेब ठरवतील.
सध्या रांजणगावचा लिपिक कामावर आणि ग्रामसेवक सुटीवर असल्याचे सांगण्यात आले?
-नाही, ग्रामसेवकावर फायनल रिपोर्ट आल्याशिवाय कारवाई होणार नाही. त्यांच्या कामाचे अधिकार तेव्हाच काढले आहे. जाधव हा आमच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही.
मग अधिकार कुणाचे?
-ग्रामपंचायत स्वायत्त संस्था आहे. तेथील कर्मचार्‍यांची भरती तेच करतात. त्यांच्यावर कारवाईचा अधिकार सरपंचांना आहे. आम्ही फायनल रिपोर्ट आल्यानंतर तसे त्यांना कळवू.
रवी जोशीदेखील कामावर आहेत?
-अजून त्यांचा फायनल रिपोर्ट आलेला नाही. तो येताच पुढील कारवाई केली जाईल. पुजारी यांचा पदभार काढून त्यांना इतर काम दिले असेल. त्याबाबत मला माहिती नाही.


प्रकरण -2 जिल्हा परिषद
रवी जोशी, कर्मचारी, जिल्हा परिषद
वेळ : सकाळी 11 वाजेची
प्रतिनिधी- आम्हाला थोडी माहिती द्या.
पुजारी- सध्या माझ्यामागे काम आहे. समोर बसलेल्या देशपांडेंना विचारा.
प्रतिनिधी- कोणते देशपांडे ते तर सांगा.
पुजारी- समोर बसतात, चहा प्यायला गेले असतील, नंतर या.
प्रतिनिधी- महत्त्वाचे काम आहे.
पुजारी- खरंच काम आहे. तुम्ही उद्या या, मग काय ते सांगतो.
प्रतिनिधी-उद्या केव्हा येऊ साहेब.
पुजारी- दुपारी या. मी इथेच असतो.
(त्यानंतर सलग दोन दिवस चमूने पाठपुरावा केल असता ते नियमीत काम करत होते.)

थेट सवाल
कैलास प्रजापती, उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग
लाच घेणारे कर्मचारी पुन्हा कामावर कसे दिसतात?
- आम्ही ट्रॅप लावताच लाच घेणार्‍या कर्मचार्‍याच्या संबंधित कार्यालयांना तत्काळ सूचना देणारा फॅक्स पाठवून अधिकार काढण्याच्या सूचना देतो.
तरीदेखील काही कर्मचारी काम करताना दिसतात?
-ही जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांची आहे. त्यांनी लाचखोराला पदावरुन काढून कार्यभार दुसर्‍याला दिला पाहिजे.
अशा प्रकारामुळे फिर्यादीवर परिणाम होतो, त्यांच्यात भीतीचे वातावरण असते?
-फिर्यादीने घाबरून जाण्याचे कारण नाही. जेव्हा ते आमच्याकडे तक्रार घेऊन येतात तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आमची असते.
आपण नेमकी कशा प्रकारची सुरक्षा देता?
-जर, फिर्यादीला पुन्हा त्या कर्मचार्‍यांनी टॉर्चर करण्याचा प्रय} केल्यास त्याने आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही पुन्हा संबंधितावर कारवाई करतो. ते आमचे अधिकार आहे.
तुम्ही फायनल रिपोर्ट देत नाहीत..
-आम्हाला संबंधित विभागाकडून कागदपत्रे वेळेवर मिळाली की आम्ही अहवाल पाठवतो.

या बातमीचा स्टिंग व्हिडिओ बघा, पुढील स्लाईडवर