आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवविवाहितेने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- धावत्या रेल्वेत छातीत चमक निघत असल्याने रेल्वेत खाली पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे प्राण परभणी येथील नवविवाहिता संगीता रमेश गोंडे हिने वाचवले. परतूर ते औरंगाबादच्या प्रवासादरम्यान तपोवन एक्स्प्रेसमध्ये ज्येष्ठ नागरिकास धीर देत त्याला औरंगाबादला आणून घाटीत दाखल केल्यानंतर त्याचे प्राण वाचले.
तपोवन एक्स्प्रेस 1 मे रोजी परभणीहून निघाली. संगीता व तिचे पती रमेश परभणी येथून बसले होते. गाडी बदनापूर स्थानकावर येण्यापूर्वी प्रवासी रामकिशन गणपतराव गोरे (65) यांच्या छातीत दुखू लागल्याने एका प्रवाशाने चेन ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास संगीताने हटकले. बदनापूर येथून रुग्णालय खूप लांब असल्याने गोरे यांना उपचार मिळणार नाहीत, असे सांगत संगीताने गोरे यांची छाती चोळत त्यांना धीर देत औरंगाबाद स्थानकापर्यंत आणले. स्थानकात गाडी आल्यानंतर संगीताने पती रमेश यांना गोरेंना खाली घेण्यासाठी पकडण्यास सांगितले. रमेश यांनी नकार देत नसत्या पंचायती करू नकोस, असे म्हणत संगीताला दम भरला, परंतु सविताने पतीचे काहीएक न ऐकता गोरे यांना खाली घेतले.
याप्रसंगी मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी रेल्वेस्थानकावर होते. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून गोरे यांना घाटीत दाखल केले. गोरे मिस्त्रीकाम करतात. त्यांच्या नातेवाइकांना गोंदिया येथे माहिती कळवण्यात आली आहे. याप्रसंगी औरंगाबादचे विशेष रेल्वे व्यवस्थापक अशोक निकम, वाहतूक निरीक्षक एल. के. जाखडे, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, रेल्वे सेनेचे प्रवीण बोरुडे आदींनी त्यांना मदत केली.