आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाणीपातळी वाढण्यासाठी खाम नदीवर बंधारा बांधा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसहभागाच्या माध्यमातून किशोर शितोळे यांनी पैठण तालुक्यात चार बंधारे बांधले. त्यात दहा कोटी लिटर पाणी साचले आहे. असाच प्रयोग खाम नदीच्या पात्रात केल्यास परिसरातील शंभर वसाहतींत विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. शिवाय नदीपात्रातील प्रदूषणही थांबवता येईल, असा सल्ला किशोर शितोळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.

पैठण तालुक्यातील ताहेरपूर, धुपखेडा आणि कवडगावमध्ये येळगंगा नदीवर लोकसहभागातून चार बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधार्‍यांचा संदर्भातील ‘गोष्ट तहानलेल्या खेड्याची’ या विषयावर पाणी कट्टा परिषदेत सादरीकरण करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी ही माहिती दिली.

..तर शंभर भागांत वाढेल पाणी
खाम नदीवर अशा पद्धतीने सर्वत्र प्रयोग केल्यास एक सिमेंट बंधारा बांधण्यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च येतो. सध्या प्रदूषणामुळे खाम नदीमध्ये पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे खाम नदीवर 500 ते 800 मीटर बंधार्‍याची साखळी निर्माण केल्यास त्याचा फायदा शहरातील जयसिंगपुरा, बेगमपुरा, विद्यापीठ परिसर, घाटी, छावणी, पाणचक्की यांसह जवळपास 100 पॉइंटमध्ये असणार्‍या विहिरींची पाण्याची पातळी वाढू शकते. शहरात अनेक भागांत मोठय़ा प्रमाणात विहिरी आहेत. मात्र, प्रदूषणामुळे तसेच पाणी नसल्यामुळे लोकांनी विहिरी बुजवून टाकल्या आहेत, तर काही विहिरी या कचर्‍याचे केंद्र बनल्या आहेत.

शहरवासीयांना होणार फायदा
शहराच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात डोंगररांगा आहेत. खाम नदीत जेथून प्रदूषण सुरू होते त्या ठिकाणाहून दहा फूट खोल खोदल्यास आणि किमान पाच ते सहा फूट पात्र रुंद केल्यास मोठय़ा प्रमाणात पाणी साचू शकते. यामध्ये 500 ते 700 मीटर अंतरावर हे बंधारे बांधता येऊ शकतात. माथा ते पायथा हे नियोजन केल्यास त्याचा फायदा होऊ शकेल.