आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत ब्रदरला मारहाण; चार तास काम बंद, नंतर संप मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बेड बदलल्याने रुग्ण अत्यवस्थ झाल्याच्या कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकांनी घाटीतील ब्रदर आशिष मोरे यांना गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता मारहाण केली. या घटनेचा निषेध नोंदवत शासकीय परिचारिका संघटनेचे ७५० कर्मचारी अवघ्या १५ मिनिटांत संपावर गेले. अधीक्षक आणि सुरक्षा व्यवस्था तत्काळ बदलण्याची मागणी संघटनेने केली आहे. मात्र, रुग्णहित लक्षात घेऊन दुपारी दोन वाजता सर्व कर्मचारी कामावर परतले.

घाटीतील ट्रॉमा केअर विभागात साजेदा बेगम इलिया सय्यद (५०) ही महिला रुग्ण २३ सप्टेंबरपासून दाखल आहे. रस्ता अपघातात मेंदूला जबर मार लागल्याने त्या उपचार घेत आहेत. पाच दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ब्रदर मोरे सकाळी च्या सुमारास बेड बदलण्यासाठी आले. त्यानंतर १५ मिनिटांनी रुग्णाला त्रास सुरू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी ब्रदरला शिवीगाळ, मारहाण केली. ब्रदर अमोल देशमुख आणि इतरांनी मोरे यांना जमावातून वॉर्डाच्या आत ओढले; पण मोरेंना इतकी जबर मारहाण होती की ते बेशुद्ध झाले.
हा प्रकार समजताच संघटना अध्यक्षा शुमंगल भक्त आणि सचिव इंदुमती थोरात यांनी काम बंदचा इशारा दिला. मेट्रन छाया चामले यांच्या प्रांगणात सर्व ब्रदर आणि सिस्टर जमा झाल्या. यानंतर पथक अधिष्ठातांच्या दालनात गेले.
अधीक्षक आणि सुरक्षा व्यवस्था बदला : आजवर घाटी रुग्णालयातील प्रत्येक अधीक्षक सकाळी ८.३० च्या सुमारास रुग्णालयात राउंड घेत होते. त्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांवर वचक राहायचा; पण दोन वर्षांत अधीक्षक असा राउंड घेत नाहीत. त्यामुळे रुग्ण आणि सुरक्षा रक्षक मनमानी वागतात. वॉर्डाबाहेर सुरक्षा रक्षक असो किंवा नसो अधीक्षकांची गाडी सांभाळण्याच्या कामी एक रक्षक गुंतवून ठेवण्यात आला आहे, म्हणून असे मारहाणीचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे अधीक्षकांना तत्काळ बदलावे अशी मागणी संघटनेच्या वतीने सचिव इंदुमती थोरात यांनी केली. दरम्यान, याप्रकरणात बेगमपूरा पोलिसांनी आरोपी परवेज खान हाफीस खान सय्यद मझहर सय्यद सुफियान यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक दीपक औटे यांनी सांगितले.
सुरक्षा यंत्रणाही बदला
अधीक्षकनियमित तसेच अनपेक्षित राउंड घेत नाहीत त्यामुळे सुरक्षा कर्मींवर कुणाचाही वचक नाही. आम्ही निष्ठेने रुग्णसेवा देतो; पण आमची सुरक्षा ते करू शकत नसतील तर त्यांना तत्काळ बदला, अशी मागणी अध्यक्षा शुमंगल भक्त यांनी केली.

आम्ही रुग्णसेवा देतो
घटनेप्रसंगी मी तिथेच होतो. ब्रदर मोरे यांनी दैनंदिन काम केले. रुग्ण स्त्री असो किंवा पुरुष आम्ही निष्ठेने सेवा देतो. या प्रकाराने सर्व जण धास्तावले आहेत. ब्रदर मोरे दोन तास बेशुद्ध होते. जमाव मोठा असल्याने आम्ही त्यांना फार वाचवू शकलो नाहीत. - अमोल देशमुख, ब्रदर, घाटी

आज घडलेला प्रकार गंभीर आहे. रुग्णालयाच्या आजवरच्या प्रथेनुसार प्रत्येक अधीक्षक राउंड घ्यायचे, पण सध्याचे अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर राउंड घेत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आम्ही नक्कीच याप्रकरणी मार्ग काढू. डॉ.चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता.
बातम्या आणखी आहेत...