आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या लग्नासाठी पैशाची तजवीज न झाल्याने भावाची आत्महत्या, राहात होते समाजमंदिरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर - घरात धाकट्या बहिणीच्या लग्नाची तारीख जवळ आलेली असताना खर्चाची तजवीज झाली नसल्यानेच लग्न कसे पार पाडावे या विवंचनेत सापडलेल्या भावाने लग्नाच्या तीन दिवस आधीच जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना बुधवारी (१२ एप्रिल ) रात्री वैजापूर तालुक्यातील भादली येथे घडली. दुर्देव असे की, बागूल यांचे राहाते घर पडले होते आणि इंदिरा आवास योजनेतील घर मिळाले नाही. यामुळे बागूल कुटुंबाला सध्या समाजमंदिरात राहात आहे.
 
बाबासाहेब रंभाजी बागूल (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आईवडिलांना एकुलता एक असलेल्या बाबासाहेब यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे वडिलांच्या पश्चात कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबवर येऊन पडली होती. त्यात एकूण चार बहिणींपैकी तिघींचे कसेबसे लग्न आधी झाले होते. धाकटी बहीण सोनाली हिचे सोमवारी (१६ एप्रिल) लग्न होणार होते. लग्नासाठी ओळखीच्याकडून उसने पैसे मागितले होते. परंतु आज-उद्या म्हणत लग्नाच्या ऐन वेळेतच पैशाला नकार मिळाला असल्याने तो आणखीच खचला होता. त्यातच हीरो होंडा दुचाकी हप्त्याने घेतलेली असल्याने तिचा एक हप्तादेखील थकला होता. त्यासाठी एजंटचा हप्त्यासाठी तगादा सुरू होता. हप्ता न भरल्यास दुचाकी ओढून नेण्याची धमकीदेखील फायनान्स कंपनीच्या एजंटने दिली होती.
 
लग्नासाठी भाऊसाहेब प्रशांत झाल्टे, सुनील या दोन मेहुण्यांनी जेवणावळी व मंडपाची जबाबदारी उचलली होती. मात्र, इतर खर्चाची न होणारी तजवीज आणि हप्त्यावर घेतलेल्या दुचाकीच्या फायनान्सच्या हप्त्याच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या बाबासाहेब याने लग्नाच्या तीन दिवस आधीच गावातील सार्वजनिक विहिरीत १२ एप्रिलच्या मध्यरात्री उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. बाबासाहेब बागूल यास सहा महिन्यांची मुलगी आहे. आधीच वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाची आणि बहीण सोनालीची जबाबदारी त्याच्या एकट्यावरच होती. मात्र, त्याने केलेल्या आत्महत्येमुळे घरातील कर्ताधर्ता पुरुष गेल्याने आई, बहीण, पत्नी आणि सहा महिन्यांची मुलगी असे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे १६ एप्रिल रोजी होणारा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला असल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले.
 
लग्नासाठी आर्थिक मदत मिळावी   
१६ एप्रिल रोजी सोनाली हिचे चोरवाघलगाव येथील तरुणाशी लग्न होणार होते. घरात लग्नसोहळ्याच्या दिवसाची सर्वच जण अातुरतेने वाट पाहत होते. मात्र, दुसरीकडे बाबासाहेबच्या मनात पैशांची चिंता सतावत होती. लग्नाची तारीख जवळ येत असताना त्याची धाकधूकदेखील वाढली होती. अशातच फायनान्सच्या तगाद्याने तो प्रचंड तणावाखाली आला असल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. लग्नसोहळ्यातील आनंदोत्सवाचे रूपांतर स्मशानशांततेत झाले.
बातम्या आणखी आहेत...