आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीचा वाढदिवसासाठी कचोरीची ऑर्डर देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एकुलत्या एक भावाचा अंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो सकाळी कचोरीची ऑर्डर देण्याकरिता घराबाहेर पडला. खिशातील मोबाइलला हेडफोन कनेक्ट करून तो गाणी ऐकत निघाला. विवेकानंद चौक (सहकार बँक कॉलनी) येथे त्याच्या दुचाकीने मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका वृद्धाला धडक दिली. वृद्ध खाली पडल्याने त्याने घाबरून दुचाकीला आणखी वेग दिला. वृद्धाला धडक दिल्याने कोणी आपला पाठलाग तर करत नाही, हे पाहण्यासाठी तो मागे वळून पाहू लागला. तेवढ्यात त्याचे हँडलवरील नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसच्या समोरच्या चाकाखाली आला. त्याचे डोके नारळासारखे फुटले. तो जागीच गतप्राण झाला. त्याने हेल्मेट घातले नव्हते. गुरुवारी (२९ सप्टेंबर) सकाळी सव्वासात वाजता ज्योतीनगर येथील वरद हॉस्पिटलसमोर हा अपघात झाला. मुकुंद ऊर्फ मधुसूदन सदाशिव टाक (१८, रा. शिवशंकर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील तीन महिन्यांपूर्वीच मरण पावले असून तीन बहिणी आणि आई असे त्याचे कुटुंब आहे. दरम्यान, बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मुकुंदची मोठी बहीण दीपाचा २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला सकाळीच कचोरीची ऑर्डर देऊन ये, असे सांगितले. त्यानुसार तो काळ्या रंगाच्या दुचाकीवरून (एम एच - २० - डी एम -७००४) रोपळेकर चौकातून संग्रामनगर उड्डाणपुलाकडे निघाला होता.

अपघात पाहताच अनेक लोक जमा झाले. नगरसेवक राजू वैद्य, संदीप पवार, अविनाश कुलकर्णी, अशोक गायकवाड आदी मदतीला धावले, पण त्याचा उपयोग झाला नाही. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुकुंदचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला. बसचालक मोहंमद जलील मोहंमद पाशुमियाँ (५१,रा. शंभूनगर) स्वत: जवाहरनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. मुकुंदची मोठी बहीण दीपाने चालकाविरोधात तक्रार दिली. अटक करून त्याची क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले.

सकाळी होत्याचे नव्हते झाले : मुकुंद त्याचे काका शेजारीच राहतात. बुधवारी रात्री तो चुलत भाऊ गौरवसोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसला होता. सकाळी झोपेत असतानाच गौरवला मुकुंदचा अपघात झाल्याचा कॉल आला. त्यामुळे त्याला जबर धक्का बसला. पोलिसांनी मृतदेहाची कायदेशीर ओळख नोंदवण्यासाठी घाटी रुग्णालयात बोलावल्यावर त्याने मुकुंदचे पार्थिव पाहून हंबरडा फोडला होता.

कानात हेडफोन होते, ट्रॅव्हल्सचा वेगही प्रचंड : सोबत आयपॅड कानात हेडफोन्स घालून मुकुंद निघाला होता. अपघात घडला तेव्हाही त्याच्या कानात हेडफोन तसेच होते. ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगाने ईझी डे मॉलकडे जात होती. लक्ष विचलित झाल्याने मुकुंदचा तोल जाऊन तो बसखाली आला. पण बसचा वेग कमी असता तर कदाचित तो वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
बहिणीचा संताप अनावर, बसवर दगड मारला
तीनच महिन्यांपूर्वी मुकुंदने त्याच्या वडिलांना गमावले होते. ते बजाज कंपनीत काम करत होते. त्याच्या तीनपैकी दोन बहिणींचे लग्न झालेले असून एक बहीण खाजगी रुग्णालयात काम करते. मुकुंद आडूळ चितेगाव येथील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. स्थानिकांनी सांगितल्यानुसार, मुकुंदची बहीणही मॉर्निंग वॉकसाठी याच परिसरात आली होती. अपघात होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये ती घटनास्थळी आली. दुपारी जवाहरनगर पोलिस ठाण्यात ती तक्रार देण्यासाठी गेली होती. या वेळी पोलिस ठाण्यातून रडत बाहेर येताच तिने तेथे जप्त करून आणलेल्या ट्रॅव्हल्स बसवर दगड फेकले. त्यात समोरील बाजूच्या काचेला तडे गेले.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला हा भीषण अपघात नेमका कसा घडला त्याचे वर्णन केले. ते त्यांच्याच शब्दात...
सकाळची वेळ असल्याने अनेक नागरिक रस्त्याच्या बाजूने, फुटपाथवरून मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यांच्यापैकी एका ज्येष्ठ नागरिकाला मुकुंदच्या दुचाकीचा धक्का लागला आणि ते खाली पडले. ते पाहून तो घाबरला. आणि वेगात पुढे निघाला. थोडे पुढे गेल्यावर आपण दिलेल्या धडकेने त्या ज्येष्ठ नागरिकाला काही गंभीर इजा तर झाली नाही ना, हे पाहण्यासाठी त्याने चालत्या दुचाकीवरूनच मागे वळून पाहिले. त्याच वेळी त्याच्या मागून एक ट्रॅव्हल्स बस (एम एच - २३ - डब्ल्यू - ५००) भरधाव वेगात ईझी डे मॉल, शहानूरवाडीकडे जात होती. मागे पाहण्याच्या प्रयत्नात मुकुंदचा हँडलवरचा ताबा सुटला आणि त्याची दुचाकी डाव्या बाजुला फेकली गेली. उजव्या बाजूने त्याचे डोके बसच्या पुढच्या चाकाखाली आले.
मार्गावर एकही गतिरोधक नाही
अमरप्रीत ते शहारनूरवाडी रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. सकाळी ते ११ सायंकाळी ते या वेळेत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबते. रुग्णालय, मोठ्या कंपन्यांची कार्यालये बँकांमध्ये आलेल्यांची वाहने रस्त्यावरच असतात. यामुळे नेहमी किरकोळ अपघात घडतात. शिवाय या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेगही अधिक असतो, असे स्थानिकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...