आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएलची हायस्पीड सेवा शेंद्रा-बिडकीन मध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-उद्योगांसह सर्वसामान्य ग्राहकांना आता माहिती तंत्रज्ञानाचे हायस्पीड दालन बीएसएनएलने उघडून दिले असून लवकरच शेंद्रा व बिडकीनमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने आयोजित केलेल्या एका टॉक शोमध्ये बीएसएनएलने औद्योगिक वसाहतींत तातडीने हे कनेक्शन देण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मान्यवरांनी केली.
फायबर ऑप्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवान इंटरनेट सेवा देणार्‍या एफटीटीएच या सेवेचा प्रारंभ बीएसएनएलने केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे पुढचे पाऊल असून या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने बुधवारी एका टॉक शोचे आयोजन केले होते. त्यात बीएसएनएलचे महाप्रबंधक पी. सी. तिवारी यांनी या सेवेची माहिती व वैशिष्ट्ये सांगितली. आगामी काळ स्मार्ट कम्युनिकेशनचा असून माहिती तंत्रज्ञान प्रत्येक घरात, व्यावसायिक प्रतिष्ठानांत अत्यावश्यक ठरणार आहे. त्यासाठी एका फायबरवरच सार्‍या सुविधा उपलब्ध करून देऊ शकणारी ही यंत्रणा असून 256 केबीपीएस पासून 100 एमबीपीएसपर्यंत अचाट स्पीडने इंटरनेट सेवा मिळेल. या सेवेची माहितीच नसल्याने खासगी कंपन्यांकडे धावावे लागते, असे सीआयआयचे उपाध्यक्ष व एक्स्पर्ट सोल्यूशन्सचे प्रशांत देशपांडे म्हणाले. मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायके यांनी ही अतिशय उपयोगी सेवा उपलब्ध आहे हे सर्वांना समजावे यासाठी उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन करण्याची सूचना केली.
मसिआचे उदय गिरधारी म्हणाले, ही सेवा उद्योगांना त्यांच्या कारखान्यापर्यंत मिळाली तर त्याचा अधिक फायदा होईल. पुष्पक समूहाचे आशुतोष बडवे यांनी ही सेवा सुरू करण्यासाठी मनपा, एमआयडीसीकडून येणारे अडथळे दूर करण्याची गरज असल्याचे सांगितले. संतोष देहाडराय म्हणाले, फायबर तंत्रामुळे स्पीड मिळत असल्याने सेवेचा दर्जा उंचावला आहे. तिवारी म्हणाले, आज वाळूज, चिकलठाण्यात ही सेवा आहे. शेंद्रा, चितेगाव, बिडकीनमध्ये सुरू होईल, याबाबत पत्रव्यवहार झाला असून लवकरच त्यावर निर्णय अपेक्षित आहे.