आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोदकाम करून फोन डिस्कनेक्ट करा, आम्हाला फरक पडत नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरवी बीएसएनएलला शहरात कुठेही खोदकाम करून केबल टाकायची असेल तर मनपा काम करण्यापूर्वी संभाव्य नुकसानीची भरपाई म्हणून बीएसएनएलकडून पैसे घेते. मात्र, मनपा वा इतर खासगी कंपन्यांकडून बीएसएनएलचे कितीही नुकसान झाले तरी बीएसएनएल मात्र काहीच कारवाई करत नाही. विशेष म्हणजे समांतर पाइपलाइनच्या कामामुळे नेमके नुकसान किती झाले, याचाही ताळमेळ बीएसएनएलला लागला नाही. काही दिवसांपूर्वी रिलायन्सकडून खोदकामादरम्यान बीएसएनएलचे बाराशे टेलिफोन डिस्कनेक्ट झाले होते. त्यापोटी अवघे ५० हजार रुपये घेऊन प्रकरण रफादफा करण्यात आले. अशा पद्धतीने "आंधळं दळतंय नि कुत्रं पीठ खातंय' असा बीएसएनएलचा कारभार सुरू आहे.

शहरात नवीन कनेक्शन्ससाठी बीएसएनएलला नव्याने केबल टाकायची असेल तर खाेदकाम करावे लागते. खोदकाम करण्यापूर्वी मनपाकडून नुकसान भरपाईपोटी चेकद्वारे पैसे देऊन परवानगी घ्यावी लागते. महापालिकेने टेलिकॉम कंपन्यांसाठी खोदकामाकरिता निर्धारित केलेल्या दराप्रमाणे पैसे दिल्यानंतरच परवानगी मिळते. मात्र, मनपाचा दर पाहूनच बीएसएनएलकडून नवीन केबल टाकणे रद्द केले जाते. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे जेव्हा मनपा वा इतर खासगी कंपन्यांकडून बीएसएनएलचे नुकसान होते, तेव्हा बीएसएनएल काहीच करीत नाही. पोलिसात एफआयआर दाखल करण्याचे अधिकार असतानाही त्याचा वापर होत नाही. त्यातून नेहमीच बीएसएनएलचे नुकसान होते; पण त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही.

समांतरच्या कामामुळे किती नुकसान?
समांतरपाणीपुरवठ्यासाठी जायकवाडीतील पंपहाऊस ते नक्षत्रवाडी असे पाइपलाइन खोदण्याचे काम मध्यंतरी सुरू होते. अर्ध्यापेक्षा अधिक खोदकाम झालेले अाहे. यामुळे या भागातील सुमारे ५०० टेलिफोन डिस्टर्ब झाल्याचा अंदाज बीएसएनएलच्या एका अधिकाऱ्याने वर्तवला. मात्र, नेमका आकडा किती आहे, याबाबत डीबी स्टार चमूने महाप्रबंधकांपर्यंत विचारणा केली. तरीही नेमका आकडा कुणालाच सांगता आला नाही. शिवाय अनेकदा पैठण एक्स्चेंज ऑफिसकडे जाणारी मुख्य केबलही नादुरुस्त झाली होती. तिची जोडणीही बीएसएनएलने केली. मात्र, याबाबत समांतर वा मनपाकडे बीएसएनएलने नुकसान भरपाईबाबत साधी विचारणाही केली नाही.

५० हजार घेतले, प्रकरण मिटले
काहीदिवसांपूर्वी रिलायन्सकडून शहरात केबल टाकण्याचे काम सुरू असताना बीएसएनएलचे १२०० टेलिफोन डिस्कनेक्ट झाले होते. त्या वेळी बीएसएनएलने रिलायन्सकडे नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावर रिलायन्सने अवघे पन्नास हजार रुपये बीएसएनएलला दिले. मात्र, नुकसानीच्या बदल्यात ही रक्कम अत्यल्प होती. त्यावर रिलायन्सने थेट महापालिकेकडे बोट दाखवले. ‘आम्ही महापालिकेकडून परवानगी घेतलेली आहे. आम्ही नुकसान भरपाई देऊ शकत नाहीत. तुम्ही आणि महापालिका बघून घ्या,' असे उत्तर त्या वेळी रिलायन्सने दिले. रिलायन्सच्या या पवित्र्यानंतर बीएसएनएलने पुन्हा काहीच केले नाही. या प्रकरणातही एफआयआर करता आला असता. मात्र, त्याची तसदी बीएसएनएलने घेतली नाही.

खोदकामासाठीचा मनपाचा दर
मनपासर्वच टेलिकॉम कंपन्यांकडून खाेदकामामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई घेते. काँक्रीटचा रस्ता असेल तर २७९० रुपये घनमीटर, डांबरी असेल तर ११०० रुपये घनमीटर खडीकरणाचा रस्ता असेल तर ७५० रुपये घनमीटरप्रमाणे पैसे घेतले जातात. ही रक्कम दिल्याशिवाय मनपा खोदकामासाठी परवानगी देत नाही.

थेट सवाल
अरविंद वडनेरकर
महाप्रबंधक,बीएसएनएल

नवीन केबल टाकण्यात काय अडचणी येतात?
खोदकामासाठीमहापालिकेकडून खूप दर आकारला जातो. त्यामुळे नवीन केबल टाकता येत नाहीत. ते परवडतच नाही.
समांतरच्याकामामुळे बीएसएनएलचे किती नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळावी यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का?
नेमकेनुकसान किती झाले, हे सांगता येत नाही. याची माहिती काढणे सुरू आहे. त्यानंतरच भरपाईसाठी घेण्यासाठी प्रयत्न करू.
महापालिकाअथवा खासगी कंपन्यांकडून नुकसान झाल्यास एफआयआर करण्याची तरतूद आहे का?
हो,आहे. पण आमच्या लाइन खूप जुन्या आहेत. काही लाइन्सच्या परवानग्याही सापडत नाहीत. त्यामुळे अडचणी येतात.
सर्वांसाठी आमचा दर सारखाच
बीएसएनएल असो अथवा खासगी टेलिकॉम कंपन्या. महानगरपालिकेचे याबाबतीतले नियम ठरलेले आहेत. खोदकाम कुणाचेही असो त्यासाठी आमचा दर सारखाच आहे. सिकंदरअली, कार्यकारी अभियंता, महापालिका
बीएसएनएलला कळवले होते
आमचे खोदकाम सुरू असताना बीएसएनएलला कळवण्यात आले होते. एवढेच नव्हे तर आमचे काम सुरू होते त्यावेळी त्यांचे कर्मचारीही हजर होते. याविषयी मी अधिक काही सांगू शकत नाही. अधिकारी,समांतर
बातम्या आणखी आहेत...