आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसपच्या पाठिंब्यामुळे सेना-भाजपचे टार्गेट ६५

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना व भाजपचे सत्तावाटप निश्चित झाल्याने औरंगाबादचे २० वे महापौर म्हणून युतीचे त्र्यंबक तुपे यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. युतीने आपल्या मतांत आणखी १५ मतांची बेगमी केल्याने संख्याबळाच्या गणितात महापौर निवडणुकीत किमान ६५ मते मिळतील असा युतीचा कयास आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरा बसपाने आपले पाच नगरसेवक महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान करतील, असे जाहीर केले. मात्र उपमहापौरपदाच्या निवडीबाबत त्यांची वेगळी रणनीती असणार आहे.
शिवसेनेचे २८ तर भाजपचे २२ नगरसेवक आहेत. युतीची संख्या अधिकृत ५० झाली असली तरी दोन्ही पक्षांचे बंडखोर अपक्ष व इतर अपक्ष अशी १३ जणांची मोट बांधण्यात युतीला यश आले आहे. त्यामुळे हे संख्याबळ ६३ पर्यंत पोहाेचते. शिवाय त्यात रिपाइं डेमोक्रॅटिकचे दोन नगरसेवक युतीच्या बाजूने आहेत. असे मिळून हा आकडा ६५ पर्यंत जातो. त्यामुळे उद्या जेव्हा हात उंचावून मतदान होईल तेव्हा किमान ६५ हात युतीच्या बाजूने वर जातील, असे आजचे चित्र आहे.

बसपाचा सेनेला पाठिंबा : पाच जागा जिंकून आश्चर्याचा धक्का देणाऱ्या बसपाने महापौरासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी घेतला. बसपा जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पालकमंत्री रामदास कदम यांची भेट घेतली व शहरातील दलित वस्त्यांचा विकास, रस्ते, पाणी, महापुरुषांचे पुतळे, दलित वस्त्यांत घरकुल योजना या विषयांवर चर्चा केली. या मागण्यांबाबत कदम यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने बसपाने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत काहीच निर्णय न घेतल्याने त्या वेळी ही मते कोठे जातील हा औत्सुक्याचा प्रश्न आहे.

एमआयएमचेही प्रयत्न
दुसरीकडे २५ नगरसेवकांच्या ताफ्यासह प्रथमच प्रवेश करणाऱ्या एमआयएमची मनपात सेना-भाजप युतीसोबतची पहिली लढाई महापौर निवडणुकीत आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी गंगाधर ढगे यांना उमेदवारी देत दलित महापौर करण्याची चाल खेळत सेना-भाजपला बुचकळ्यात टाकले होते. पण नंतर युतीने हे डॅमेज कंट्रोल केल्याने उद्या एमआयएमचा आकडा कुठपर्यंत जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेस एमआयएमसोबत जाते की युतीसोबत की तटस्थ हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.