औरंगाबाद - बहुजनसमाजवादी पक्ष महापालिका निवडणुकीत सर्वच म्हणजे ९९ वाॅर्डांत उमेदवार उभे करणार असून किमान २५ जागा कशा निवडून आणता येतील याची व्यूहरचना पक्षांतील वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. निवडणूक एप्रिल २० १५ मध्ये होणार असल्या तरीही ९९ वाॅर्डांत सर्वजातीय उच्चशिक्षित तरुणांची शोधमोहीम सुरू करण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना दिले आहेत.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर यंदा सर्वच राजकीय पक्ष
आपली ताकद पणाला लावण्याच्या तयारीत आहेत. एमआयएमपाठोपाठ बसपनेदेखील शहरात वाॅर्डावॉर्डांत उमेदवारांची जोरदार शोधमोहीम सुरू केली असून या निवडणुकीत किमान २५ जागा निवडून आणण्याचे टार्गेट दिले आहे.
बसप-एमआयएम युतीची शक्यता मावळली
औरंगाबादशहरातील मनपाची सत्ता काबीज करायची असेल तर एमआयएमसोबत युती करावी, असा विचार काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहोचवला होता. मात्र, यावर पक्षात एकमत झाल्याने सध्या तरी बसप-एमआयएम युतीची शक्यता नाही, अशी माहिती बसपमधील सूत्रांनी दिली.
उमेदवारांचा शोध सुरू
-बसपमहापालिका निवडणुकीत उच्चशिक्षित बहुजन समाजातील तरुण उमेदवारांना तिकीट देण्याच्या विचारात आहे. तशी तयारीही पक्ष कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. ६० टक्के उमेदवार ओबीसी-ओपन प्रवर्गातून, तर ४० उमेदवार एससी, एसटी प्रवर्गातून दिले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी पक्षाच्या अध्यक्षा मायावतींची सभाही शहरात आयोजित केली जाईल. अॅड.शंकर वानखेडे, जिल्हासचिव, बसप