आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात साकारतेय 25 फूट उंच बुद्धमूर्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हैदराबादच्या हुसैनसागरसारखा हुबेहूब पार्क जालना शहरात होत आहे. मोती तलावावर हे सौंदर्यीकरण केले जाणार असून त्यावर बसवण्यात येणारी 25 फूट उंचीची बुद्धमूर्ती शहरात आकाराला येत आहे. प्रख्यात शिल्पकार सुनील देवरे यांच्या स्टुडिओत मागील सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. 65 लाखांच्या या बुद्धमूर्तीचा भारतीय चेहरा असून पंचधातूमध्ये तयार होत आहे. सहा महिन्यांत मूर्ती पूर्णत्वास येईल, त्यानंतर तलावाच्या सौंदर्यीकरणाचेही काम होणार आहे.

हुसैनसागरातील बुद्धमूर्तीची स्थापना करताना तीन वेळा पाण्यात बुडाल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. जालन्यातील मोतीतलावाचेही असेच सौंदर्यीकरण करण्याचा जालना नगरपालिकेने 15 ऑक्टोबर 2013 रोजी ठराव घेतला. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा पद्मा भरतीया यांच्या पुढाकाराने हे पार्क आकाराला येत आहे. पालिकेतील काँग्रेसचे गटनेते नगरसेवक अ‍ॅड. राहुल हिवराळे यांनी हा ठराव काँग्रेसच्या 28 नगरसेवकांसह मंजूर करून घेतला आहे. या मोतीतलावात 25 फूट उंचीचा चबुतरा तयार करण्यात येणार असून त्यावर 25 फूट बुद्धमूर्तीची स्थापना केली जाईल. पन्नास फूट उंचीच्या या प्रकल्पासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याशिवाय राज्य सरकारकडे सरोवर संवर्धनासाठी सहा कोटींच्या निधीचा प्रस्ताव दिला आहे. हा निधी मिळाला नाही तरीही पालिकेच्या नफा निधीतून 1 कोटी 25 लाखांचा खर्च करून पार्क तयार करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. हिवराळे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
अजिंठ्यातील हुबेहूब शिल्प साकारणारा कलावंत
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील हुबेहूब शिल्प लेणीच्या पायथ्याशी नव्याने तयार करण्यात आलेल्या अभ्यागत कक्षात सुनील देवरे यांनी तयार केले आहे. त्यांच्या या कामाची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री चिरंजीवी यांनीही प्रशंसा केली. शिवाय चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित शिल्पसृष्टीही त्यांनी केली आहे. 22 मुरल्सच्या (भित्तिशिल्पे) आकर्षक सृष्टीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अकरा टनांची बुद्धमूर्ती
25 फूट उंच आणि 10 फूट रुंदीची ही बुद्धमूर्ती सुनील देवरे तयार करत आहेत. सर्वसाधारणपणे बुद्धमूर्ती या थायलंड, जपान, कोरियातील चेह-याप्रमाणे तयार केल्या जातात. ही बुद्धमूर्ती मात्र भारतीय चेह-याची असून 10 फुटांच्या कमळावर उभी असल्याची प्रतिकृती आहे. 11 टन ब्राँझ धातूतील शिल्पाचे आता क्ले तयार आहे. मूर्ती सध्या सोलापूरला पाठवली आहे, लॉस्ट रॅट मोल्डिंगचे काम केल्यानंतर पुन्हा औरंगाबादला येणार आहे. धातूचे काम करून सहा महिन्यांत अत्यंत सुंदर व आकर्षक बुद्धमूर्ती आकाराला येईल.