आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पाची चिरफाड, सेना सदस्यांचा"स्थायी'तून सभात्याग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात प्रशासनाने काही नगरसेवकांच्या वॉर्डातील विकासकामांसाठी तीन कोटींंची तरतूद, तर काही नगरसेवकांच्या वॉर्डांसाठी छदामाचीही तरतूद करता ७७७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारच्या स्थायी समितीत मांडला. या अर्थसंकल्पावर शिवसेना, भाजप, एमआयएम, काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करून पूर्वीचाच अर्थसंकल्प कायम करण्याची मागणी केली. मात्र कुठलाच निर्णय झाल्याने शिवसेनेचे नगरसेवक गजानन मनगटे यांनी अर्थसंकल्पाची प्रत फाडली. तर शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे स्थायीची सभा दुसऱ्यांदा तहकूब करावी लागली.
मनपा अर्थसंकल्पावर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्याने बुधवारी आयोजित स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली होती. शनिवारी ही बैठक सकाळी ११ वाजता सभापती दिलीप थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. पूर्वीच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या वॉर्डात ५० ते ८० लाखांची कामे होती. ही सर्व कामे वगळून मोजक्याच नगरसेवकांच्या वॉर्डात कोट्यवधींची कामे घेण्यात आली, असा आक्षेप नगरसेवकांनी घेतला. अशी मनमानी करण्याचा अधिकार मनपाच्या अधिकाऱ्यांना आहे का? जर अधिकाऱ्यांनाच अर्थसंकल्प तयार करायचा होता तर स्थायी समितीची काय गरज, असा सवाल करून हा अर्थसंकल्पच रद्द करा, अशी मागणी मोहन मेघावाले, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, नितीन चित्ते, अब्दुल नाईकवाडी, विकास एडके, समिना शेख, रावसाहेब आमले, गजानन बारवाल या नगरसेवकांनी केली. सुरुवातीला थोरात यांनी आपण अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावरच निर्णय घेणार असल्याचे नगरसेवकांना सांगितले. अर्थसंकल्पात आमच्या वॉर्डातील कामांचा समावेश नाही. सर्व अधिकारच अधिकाऱ्यांना दिले असतील तर हा अर्थसंकल्प आमच्या काहीच कामाचा नाही, असे म्हणत मनगटे यांनी सभागृहातच अर्थसंकल्प फाडून फेकला. अर्थसंकल्पाचा आणि स्थायी समितीचा काय फायदा, अशी खंत व्यक्त करत रावसाहेब आमले, मकरंद कुलकर्णी, मोहन मेघावाले, ज्योती पिंजरकर, कमलाकर जगताप, गजानन मनगटे यांनी सभागृहाचा त्याग केला. सभापती थोरात यांनी या सदस्यांना "तुम्ही बसा आपण यावर निर्णय घेऊ' अशी वारंवार विनंती केली. मात्र, नगरसेवकांनी सभागृह सोडणेच पसंत केले.

आयुक्तांनी सोडली बैठक
खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुभेदारीवर विशेष बैठक बोलावल्याचा निरोप आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना मिळाला. त्यांनी स्थायीतील बजेटची महत्त्वाची बैठक सोडून पुढील पदभार अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यावर सोपवून सभा सोडली.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मनमानी करून नगरसेवकांच्या वॉर्डातील कामे वगळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आयुक्तांकडे मागणी करणार आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आज बैठक पुन्हा तहकूब करण्यात आली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग करण्यास अधिकारीच दोषी आहेत, असे सभापती दिलीप थोरात यांनी सांगितले.

प्रशासनाच्या कामांचा समाचार
नगरसेवकांनीआराेप केला की, गेल्या वर्षी नगरसेवकांना २० लाख रुपयांचे तुकडे (निधी) फेकले. कामे मात्र झाली नाही. थोरात यांच्या साधेपणाचा अधिकाऱ्यांनी गैरफायदा घेतला. अग्निशमन विभागासाठी ५० लाखांची तरतूद केली; पण या विभागाकडे ३६ मीटरची शिडी नाही. त्यांचे ऑडिटही नाही. हा निधी कशाच्या आधारे दिला. २३५ कोटींच्या मालमत्ता कराचे टार्गेट ठेवले. यात थकीत किती आणि नवीन कर किती याचे काहीच स्पष्टीकरण नाही. सहा आदर्श रस्ते करण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक कोटी रुपये दिले. यातून व्हाइट टॉपिंगचा किती मीटर रस्ता होणार.

नगररचनाकडून ७० कोटी रुपये मिळतील, असा उल्लेख केला; पण हा िनधी कुठून आणि कसा येणार? कारण वर्षभरात केवळ १२०० बांधकाम मंजुरी, २२० कम्प्लिशन आहेत. यातून ७० कोटी कसे मिळणार? डांबर प्लांट आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे असलेल्या मोफत अंत्यविधी योजनेचा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे उगाच बजेट फुगवू नका. वास्तववादी बजेट सादर करा. प्रशासनावर नियंत्रण नसले तर, नगरसेवकांवरील जनतेचा विश्वास ढळू देऊ नका, अशा सूचना चित्ते यांनी करून अर्थसंकल्पाचा प्रशासनाच्या कामांचा खरपूस समाचार घेतला.
बातम्या आणखी आहेत...