आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प खर्चवाढीला लागेबांधे कारणीभूत; शिरीष पटेल यांची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जनतेसाठी चांगले प्रकल्प करावे असे पूर्वी सरकारलाही वाटायचे, आता ‘संबंधां’वर कामे केली जातात. मग त्याच्या किमती वाढतात आणि त्याचे खुशाल सर्मथनही केले जाते, अशी खंत मुंबईतील पहिल्या उड्डाणपुलाचे निर्माते आणि ख्यातनाम स्थापत्य विशारद शिरीष पटेल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

इको सेन्स कंपनीच्या इको कुकरच्या लाँचिंगसाठी औरंगाबादेत आलेले शिरीष पटेल हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही काम करतात. स्थापत्य विशारद म्हणून देश-विदेशात ओळख असणार्‍या पटेल यांनी मुंबईतील पहिला उड्डाणपूल तयार केला. 1965 मध्ये पेडर रोडवर हा उड्डाणपूल बांधण्यात आला. सध्या पायाभूत सुविधा हा परवलीचा शब्द बनला असून त्यातून मोठमोठी कामे हाती घेतली जात असली तरी या कामांबाबत पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, 1965 मध्ये पेडर रोडचा उड्डाणपूल बांधला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. सरकारलाही जनतेसाठी असल्याने काम चांगले झाले पाहिजे असे वाटत होते. पण आता तसे कुणाला वाटत नाही. आज बांधकाम क्षेत्रातील ज्ञानापेक्षा ‘संबंधां’वरच कामे केली जातात. सरकारच्या योजना या जनतेच्या फायद्यासाठी न राहता त्या पैसा खर्च करण्यासाठीच असतात असे चित्र दिसते.

पटेल म्हणाले की, किमती वाढण्याची अनेक कारणे असतात. पण हे प्रकल्प पैसा खर्च करण्यासाठीच असल्याने अवाढव्य खर्च होत असतो. सध्या मुंबईतील स्कायवॉकची खूप चर्चा सुरू आहे. हा अत्यंत महागडा प्रकल्प आहे. त्याचा प्रति चौरस मीटरचा खर्च पाहता एकूण प्रकल्पाचा खर्च वांद्रे-वरळी सी लिंकपेक्षाही कैकपटींनी अधिक असणार आहे. त्याबाबत काही बोलले जात नाही. उलट त्या फुगवलेल्या खर्चाचे सर्मथनच केले जाते. स्कायवॉकवरील जाहिरातींमधून पैसा मिळेल, असे सांगत प्रकल्पाच्या अव्यवहार्य खर्चाचे सर्मथन केले जात आहे.

40 टक्के ऊर्जा स्वयंपाकघरात खर्च
स्थापत्य विशारद असतानाच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करणारे पटेल इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अर्थात आयसीटीचे मानद प्रोफेसर आहेत. या कामाबाबत ते म्हणाले की, 35 वर्षांपासून मी अपारंपरिक ऊर्जेवर काम करत आहे. ऊर्जेच्या एकूण वापरापैकी 40 टक्के ऊर्जा स्वयंपाकघरात खर्च होते. त्यामुळे हे इंधन वाचवायला हवे यासाठी काम सुरू आहे. जगभर ऊर्जा बचतीसाठी स्टोव्ह सक्षम करण्यावर काम होत असताना आपण स्वयंपाकाच्या भांड्यांवर लक्ष केंद्रित केले. स्वयंपाकाचे भांडे आणि स्टोव्ह, गॅसची ज्योत यांचे प्रमाण योग्य राहिले तर 30 टक्के ऊर्जा वाचते. मग आम्ही भांडी इन्सुलेट केली. त्यामुळे निर्माण होणारी उष्णता वाया न जाता वापरली जाते. यातदेखील 30 टक्के ऊर्जा वाचते. शिवाय अन्न शिजवताना शेवटपर्यंत उष्णतेची गरज नसते. त्यामुळे स्टोव्ह अथवा गॅस बंद करून बंद कंटेनरमध्ये ते काम त्याच वेळेत होते. शिवाय एका कंटेनरमध्ये अन्न शिजवण्याऐवजी ते चार कंटेनरमध्ये शिजवले तर ऊर्जा कमी लागते. यातदेखील सुमारे 30 टक्के ऊर्जा वापरली जाते. हे तंत्र वापरून आम्ही मुंबई विद्यापीठाच्या कँटीनसाठी भांडी तयार करून दिली असता तेथे 30 ऐवजी 20 गॅस सिलिंडरवर काम भागू लागले. अपारंपरिक ऊर्जा वापराबाबत सरकार काय किंवा नागरिक काय, दोघेही फारसे जागरूक नसल्याची खंत शिरीष पटेल यांनी व्यक्त केली.