आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्ज सुविधेमुळे औरंगाबादेत बुलेटप्रेमी वाढले; खरेदीसाठी पाच महिन्यांचे वेटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एकेकाळी फौजदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती वापरत असलेल्या बुलेटला बाजारात सध्या मोठी मागणी आहे. विशेषत: महाविद्यालयीन तरुणांमध्ये याची क्रेझ वाढताना दिसून येते. बुलेटचे सुधारित 600 ते एक हजार सीसीचे ‘कॅफे रेसर’ मॉडेल लवकरच बाजारात येत असून फायनान्स कंपन्यांनी बुलेटसाठी वित्तपुरवठा सुरू केल्याने खरेदीसाठीचा प्रतीक्षा कालावधी पाच महिन्यांपर्यंत गेला आहे.

रॉयल एनफील्डची भारतात 1949 पासून विक्री होते. सैन्य व पोलिस दलात पेट्रोलिंगसाठी बुलेटला अधिकृत प्राधान्य देण्यात आले. सर्वप्रथम भारत सरकारने 350 सीसीच्या 800 बुलेटची खरेदी केली होती. मूळ ब्रिटन येथील रेडिच कंपनीने मद्रास मोटार्ससोबत भागीदारी करून एनफील्ड इंडिया नावाने कंपनी सुरू केली. यात मद्रास मोटार्सची 50 टक्के भागीदारी आहे. भारतातून युरोपातील देश, अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये बुलेटची निर्यात केली जाते.

दरमहा 200 गाड्या हव्यात
‘मेड लाइक अ गन, गोज लाइक अ बुलेट’ अशी ओळख असलेली मोटारसायकल तरुणांना अधिक प्रिय झाली आहे. शहरात प्रतिमहिना 150 ते 200 गाड्यांची मागणी असून प्रत्यक्षात मात्र पन्नास गाड्याच मिळतात. गाडीत ब्रेक सिस्टिम प्रचलित गाड्यांप्रमाणे उजव्या पायाखाली ठेवण्यात आहे. नवीन मॉडेल्समध्ये सेल्फ स्टार्ट पद्धत आली आहे. बुलेट प्रतिलिटर 30 ते 40 कि.मी. धावते, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. पूर्वी 225 किलो वजन असलेली बुलेट आता 187 किलोपर्यंत आहे.

सात महत्त्वाचे मॉडेल्स
बुलेटमध्ये 350 सीसीमध्ये स्टँडर्ड, इलेक्ट्रा, क्लासिक व थंडरबर्ड ही मॉडेल्स व 500 सीसीमध्ये डेझर्ट स्ट्रॉम, क्रोम व क्लासिक या मॉडेल्सची निर्मिती करण्यात आली आहे. स्टँडर्ड 500 या ‘फॉरेस्ट ग्रीन’ मॉडेलला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

लाखाच्या पुढे दर
बुलेटचे दर एक लाख 12 हजारांपासून एक लाख 83 हजारांपर्यंत आहेत. ‘क्रोम’ची किंमत सर्वाधिक म्हणजे एक लाख 83 हजार आहे. बुलेटचे ‘फॉरेस्ट ग्रीन’ मॉडेल पंजाबमध्ये लाँच झाले असून त्याची किंमत एक लाख 80 हजारांच्या दरम्यान आहे. लवकरच ‘कॅफे रेसर’ व ‘फुरी’ ही मॉडेल्स येत आहेत.