आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धार्थ उद्यानात मैत्रिणीसोबत बसलेल्या सराफा व्यापाऱ्याला लुटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या सराफा व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील २२ हजार रुपये आणि बँकेची महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून तिघांनी पोबारा केला. हा थरार शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता घडला. विशेष म्हणजे सायंकाळच्या वेळी उद्यान माणसांनी फुलून गेलेले असते. या घटनेनंतर उद्यानात एकच धावपळ सुरू झाली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उद्यानात शुक्रवार आणि रविवारी नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते. धावणी मोहल्ला येथील पोपट राजाराम ढगे (३०) हा तरुण सराफा व्यापारी मैत्रिणीसोबत उद्यानात गेला. ते कुठे बसतात, कसे बसतात याची टेहळणी करून तिघांपैकी एक जण त्यांच्या जवळ गेला. तुम्ही या ठिकाणी कसे काय बसले? तुमचे एकमेकांशी काय नाते आहे? अशी त्याने विचारणा केली. पोपट प्रत्युत्तर देण्यासाठी उभा ठाकताच अन्य दोघे धावत त्याच्याजवळ आले. एकाने चक्क चाकू काढून पोपटच्या पोटाला लावला. ‘बेट्या, याद राख... ओरडला किंवा थोडीही गडबड केलीस तर तू जिवानिशी गेलास म्हणून समज,’ अशी धमकी दिली. फायटरने त्याचे तोंड फोडले. त्याला मारहाण होत असल्याचे पाहून मैत्रीण ओरडण्याचा प्रयत्न करत असतानाच तिलाही मारहाण करण्यात आली. सोबत मैत्रीण आणि लुटणारे तिघे असल्यामुळे पोपट शांतपणे उभा राहिला. त्याच्या तोंडातून रक्तस्राव होत होता. दरम्यान, चोरट्यांनी पोपटच्या खिशातील २२ हजार रोख रकमेसह आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डेबिट कार्ड हिसकावून चोरटे पसार झाले. ‘पकडा, पकडा.. चोर, चोर...’ असा आरडाओरडा करण्याचा काहीसा प्रयत्न पोपटने केला. पण उपयोग झाला नाही.

गुन्हेगारांची ओळखपरेड
पोपटचीअवस्था ‘पकडले तर चावेल अन् सोडले तर पळेल’ अशी झाली होती. त्याने प्रथम घाबरलेल्या मैत्रिणीला धीर देत तिला तिच्या घरी जाण्यासाठी सांगितले आणि त्यानंतर थेट क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार सहायक पोलिस निरीक्षक शेख अकमल यांना सांगितला. शेख यांनी तातडीने उद्यानात पथक पाठवले आणि चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर उद्यान परिसरातील गरम पाणी, छावणी आणि भोईवाडा भागातील काही सराईत गुन्होगारांना पकडून त्यांची ओळखपरेड घेण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...