आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणाच्या वादातून पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा घाटीत मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी पाहणी करत असताना अंगावर राॅकेल घेऊन पेटवून घेतलेल्या नागरिकाचा उपचार चालू असताना रुग्णालयात गुरुवारी पहाटे सव्वापाचला मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी उत्तम बंडू भंडारी (५०, लायननगर, वाळूज) याचा मृतदेह सरळ पोलिस ठाण्यात अाणला होता. त्यानंतर वाळूज पोलिसांनी कारणीभूत ठरलेल्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून चार जणांना अटक केली आहे. त्यानंतर मृतावर तणावग्रस्त वातावरणात दुपारी सव्वातीनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

लायननगरातील उत्तम भंडारी यांच्या घरासमोरून उत्तर-दक्षिण असा रस्ता जातो. त्यांच्या घरानंतर असलेल्या घराचे कुसुमबाई सोनवणे त्यांचा मुलगा सुभाष सोनवणे यांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला. हा रस्ता पुढे किशोर नाडे, उज्ज्वला डोंगरजाळ, रेखा रोडे, कल्पना म्हस्के, आशाबाई चव्हाण यांच्या घरांसाठी होता. तो बंद झाल्याने उत्तम भंडारी संबंधितांमध्ये वाद होता. १८ जून रोजी सकाळी उत्तम भंडारी यांच्या अरुण या मुलाने ग्रामपंचायत गाठून सुभाष सोनवणे हे रस्त्यात अतिक्रमित घराचे बांधकाम करत असल्याची तक्रार केली होती. तेव्हा सरपंच सुभाष तुपे हे इतर पदाधिकाऱ्यांसह अतिक्रमित जागेची पाहणी करत असताना दुसऱ्या बाजूला कुसुमबाई सोनवणे, किशोर नाडे, सुभाष सोनवणे, उज्ज्वला डोंगरजाळ, रेखा रोडे, कल्पना म्हस्के, आशाबाई चव्हाण यांच्याकडून अगोदर भंडारी यांचे अतिक्रमण हटवा, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे रागाच्या भरात भंडारी यांनी अंगावर रॉकेलची कॅन ओतून घेऊन पेटवून घेतले. त्यात ते ६० टक्के भाजले होते.

उपचारांसाठी घाटीत दाखल
ही घटना घडताच घटनास्थळावरून सर्वांनी काढता पाय घेतला. जखमी भंडारी यांना त्यांच्या नातेवाइकांनी उपचारासाठी घाटी शासकीय रुग्णालयात दाखल केले. जमादार उपेंद्र कुतूर, महिला पोलिस अरुणा गालट यांनी जबाब नोंदवला होता. त्यात सुभाष सोनवणे, कुसुमबाई सोनवणे, किशोर नाडे, उज्ज्वला डोंगरजाळ, रेखा रोडे, कल्पना म्हस्के, आशाबाई चव्हाण हे गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असूून त्यांच्या त्रासाला कंटाळून मी पेटवून घेतल्याचा जबाब दिला होता. पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला, त्यानंतर भंडारी यांच्यावर शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

तक्रारीत अतिक्रमणाबाबत उल्लेख नाही
मृतभंडारी यांची पत्नी ताराबाई यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यात सुभाष सोनवणे, कुसुमबाई सोनवणे, किशोर नाडे, उज्ज्वला डोंगरजाळ, रेखा रोडे, कल्पना म्हस्के, आशाबाई चव्हाण या जणांनी शैचालयाचे बांधकाम थांबवून आम्हा पती-पत्नीला मारहाण केली. त्यामुळे माझ्या पतीने रागाच्या भरात अंगावर राॅकेल घेऊन पेटवून घेतल्याने त्यात त्यांचा अंत झाला. याप्रकरणी वरील सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवावा. पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तक्रारीची दखल घेऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला.

चार जण अटकेत : पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर तातडीने चार आरोपींना अटक केली आहे. त्यात उज्ज्वला डोंगरजाळ, रेखा रोडे, सुभाष सोनवणे किशोर नाडे यांचा समावेश असल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी सांगितले.
छायाचित्र: गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी उत्तम भंडारी यांचा मृतदेह वाळूज पोलिस ठाण्यात आणण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...