आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- खुलताबादच्या भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन परतणारी भरधाव फोर्ड आयकॉन कार नाशिककडे जाणार्या एसटीवर आदळल्याने कारमधील तीन कॉलेज तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मिटमिटा भागात हॉट स्पॉट ढाब्याजवळ सोमवारी ही दुर्घटना घडली. अपघातात कारचा चुराडा झाला. कारचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. या मार्गावरील वाहतूक सुमारे पावणेतीन तास खोळंबली होती. गारखेडा भागातील बिनेश करीराम यादव (19, ई/3, कासलीवाल इस्टेट), क्षितिज सुरेश देशमुख (21, सह्याद्री हिल्स, बागडियानगर) व मूळ सिल्लोड येथील शास्त्रीनगरात राहणारा यश शिवाजी गायकवाड (19) हे महेश मंडरेसह रविवारी सकाळी कारने (एमएच 28 सी 2814) सिल्लोडला गेले होते.
तेथून ते रात्री 8.30 वाजता निघाले आणि दहाच्या सुमारास औरंगाबादला पोहोचले. महेशला पदमपुर्यात सोडून रात्री 11 वाजेपर्यंत तिघेही त्यांच्या मित्रांच्या संपर्कात होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी माहिती देताना सांगितले की, पहाटे 3.30 च्या सुमारास बिनेशच्या कारने तिघेही खुलताबादला गेले. सकाळी भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर ते औरंगाबादला परतत होते. मिटमिट्याजवळील हॉट स्पॉट ढाबा ते टायगर फार्म हाऊसदरम्यान समोरून धावणार्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारचालक बिनेशचा ताबा सुटला आणि भरधाव कार नाशिककडे जाणार्या एसटीवर (एमएच 06 एस 8389) चालकाच्या बाजूने आदळली. कार सुमारे दहा फूट उंच उडून पुन्हा खाली आदळली आणि एसटीच्या समोरील भागात शिरली. यामुळे एसटीच्या समोरील भाग चेपला गेला तर कारचा पार चेंदामेंदा झाला. यात कारचालक बिनेशसह पाठीमागे बसलेला यश आणि क्षितिजचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर मिटमिट्यातील नागरिकांनी कार व एसटीच्या दिशेने धाव घेतली. अवघ्या दहा मिनिटांत अग्निशमन दल अपघातस्थळी दाखल झाले. गॅस कटर, सब्बलने कारचा पत्रा कापून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घाटीतील सेवाभावी ट्रस्टच्या रुग्णवाहिकेने तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत आणले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार छावणी पोलिस ठाण्यात आणण्यात आली. एसटीचालक वाल्मीक शिवराम दाते (46, रा. जळगाव, ता. येवला) यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
यशकडून होत्या मोठय़ा अपेक्षा...
यश हा अभ्यासात खूप हुशार तर होताच शिवाय होतकरु होता. त्याचे आजोबा पंडितराव गायकवाड हे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आहेत. तर त्याचे वडील शिवाजीराव हे प्लॉटींगचा व्यवसाय करतात. यश मोठा असल्याने घरच्यांना त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. त्याचा धाकटा भाऊ हर्षल हा पुण्याला शिक्षण घेत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. क्षितिजचे वडील सुरेश देशमुख यांचा बीड बायपास रोडवर सिमेंटच्या गट्टूचा कारखाना आहे. त्यांना क्षितिज हा एकुलता एक मुलगा होता.
तिघेही जिवलग मित्र
बिनेश, यश, क्षितिज हे रिव्हरडेल शाळेत सोबतच होते. यश तिसरीत असल्यापासून सिडको एन-1मध्ये आत्या-मामा दिवाकर जाधव यांच्याकडे राहायचा. यश, क्षितिज विवेकानंद कॉलेजात बीसीएस प्रथम वर्षाला होते. बिनेश हा वाळूजमधील हायटेक इंजिनिअरिंग कॉलेजात सिव्हिल तृतीय वर्षाला शिकत होता.
26 रोजी वाढदिवस
बिनेशचा मोठा भाऊ चीनमध्ये एमबीबीएस तृतीय वर्षाला आहे. बहीण व भाऊ किड्स किंगडम शाळेत शिकतात. पाच महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याचे वडील करीराम यादव हे काल्डा कॉर्नरच्या युनिक अकॅडमीचे अध्यक्ष होते. बिनेश त्याची जबाबदारी सांभाळत होता. त्याचा 26 रोजी वाढदिवस होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.