आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजमध्‍ये भरधाव बस कारवर धडकली; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतणार्‍या जालना येथील राऊत कुटुंबीयांच्या कारवर एसटी महामंडळाची भरधाव बस आदळली. या अपघातात कारमधील कल्याणी ऊर्फ कशीश आशिष राऊत (28) ही विवाहिता जागीच गतप्राण झाली, तर तिचा पती आशिष अंकुशराव राऊत (34, रा. राऊतनगर, जालना) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात वाळूज महानगरातील नवीन मुंबई महामार्ग टी पॉइंटवर रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास झाला. जखमी आशिष राऊत यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बसचालक एच. बी. भगत (42, रा. जालना) याला ताब्यात घेतले आहे.


जालना येथील राऊतनगरातील आशिष राऊत हे पत्नी कल्याणी ऊर्फ कशीशसह नवीन मुंबई महामार्गाने इंडिगो कारने (एमएच 21 एएफ 007) ने औरंगाबादकडे येत होते. आशिष हे स्वत: कार चालवत होते, तर कल्याणी त्यांच्यालगतच्या सीटवर बसल्या होत्या. त्यांची कार ए. एस. क्लबसमोरील चौकात नगर-औरंगाबाद महामार्गावर आली. मात्र, राऊत यांना नगर-औरंगाबाद महामार्गावर आल्याचे कळाले नाही. त्यांनी कार वन-वे वरून सरळ पुढे नेली. औरंगाबादकडून आलेली यवतमाळ-पुणे बस (एमएच 06 एस 8350) कारवर डाव्या बाजूने धडकली. बसने कारला सुमारे 50 फुटांपर्यंत फरपटत नेले. या अपघातात कल्याणी यांचा जागीच मृत्यू झाला तर आशिष गंभीर जखमी झाले. त्यांना शहरातील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये 29 प्रवासी होते. मात्र, बसमधील कुणीही जखमी झाले नाही.