आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट’च्या नव्या प्रस्तावात बससेवा, पर्यटन हेच लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात शहराचा समावेश करण्यासाठी मनपाच्या वतीने १७३० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात 'पॅन सिटी’त केवळ सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनाला चालना मिळण्यासाठीच उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली. या प्रस्तावाचे सादरीकरण फोरट्रेस या सल्लागार समितीचे ए. एस. कुमार यांनी केले.

पहिल्या टप्प्यात शहराचा स्मार्ट सिटी योजनेतील समावेश हुकल्याने शासनाने मनपाला चांगला प्रस्ताव तयार करून तसेच विशिष्ट बाबींवर लक्ष केंद्रित करत दुसऱ्या टप्प्यासाठी उत्तम सादरीकरण करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ३० जूनपूर्वी मनपाला प्रस्ताव सादर करायचा आहे. योजनेत शहराचा समावेश व्हावा यासाठी मनपाचे अधिकारी पदाधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू अाहे. पूर्वीच्या प्रस्तावात काही बदल करण्यात आले. “पॅन सिटी’तच हे बदल करण्यात आले आहेत. त्याचे सादरीकरण शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात करण्यात आले. १७३० कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव असून त्या बदल्यात शासन आणि मनपाला १९३० कोटी रुपयांचा लाभ होणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
प्रस्तावातीलबदल : ग्रीनफील्ड इंडस्ट्रीच्या कामगारांसाठी तसेच अल्प उत्पन्न असणाऱ्यांसाठी तीन हजार ४९० घरे बांधून िदली जाणार आहेत. पूर्वी चार लाख रुपयांत २५, ४५ आणि ६५ स्क्वेअर मीटरची घरे बांधून दिली जाणार होती. या प्रस्तावात प्रत्येकी स्क्वेअर मीटर जागेची वाढ करण्यात आली. व्हिजनमध्ये हेल्दी सिटी, पर्यावरण संतुलन, टुरिझम, वर्ल्ड क्लास सुविधा, इंडस्ट्रियल हेल्प सेफ सिटी या बाबींचा समावेश होता. त्यात सेफ सिटी, टुरिझम, सार्वजनिक वाहतूक आणि इंडस्ट्रियल टुरिझम मॅनेजमेंटची भर घालण्यात आली. पूर्वीच्या प्रस्तावात ग्रीन फिल्ड गटातील स्ट्रीट लाइट, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, ई- गव्हर्नन्स, अर्बन मोबिलिटी यापैकी नवीन प्रस्तावात वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, -गव्हर्नन्स वगळण्यात आले. तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, अर्बन मोबिलिटी स्ट्रीट लाइटसह इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंटचा समावेश करण्यात आला. शिवाय स्पोर्ट सेंटरसह एंटरटेनमेंट पार्क आणि कन्व्हेन्सिंग सेंटर हॉटेल तसेच टुरिझमचाही समावेश करण्यात आला.
सुधारित प्रस्तावानुसार पॅन सिटीत सार्वजनिक वाहतूक घनकचरा व्यवस्थापनात आयटी बेस स्मार्ट सोल्युशन असतील. रस्ते, फुटपाथ सायकल ट्रॅक, पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्या, वीज, टेलिफोन केबलिंग भूमिगत असेल. पर्यटन उद्योगवाढीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असेल. सुरक्षितता, शाश्वत परवडणाऱ्या सेवेवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्याचबरोबर ५५ हजार पथदिवे बसवण्यात येणार आहेत. बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा, रस्त्यांनी काही आपत्ती आल्यास तातडीने पोलिस अथवा वैद्यकीय मदत पोहोचावी यासाठी काही ठिकाणी पॅनिक बटण दिले जाईल. कचरा उचलणाऱ्या वाहनांत जीपीएस यंत्रणा असेल. कचरा कुंड्यांना सेन्सर लावलेले असेल. कचरा व्यवस्थापनावर एकाच कक्षातून नियंत्रण ठेवले जाईल.
सर्व सुविधा असतील
शाळा, महाविद्यालये, अग्निशमन कार्यालये, पोलिस ठाणे, दवाखाने, समाज मंदिरे या सामाजिक सुविधांवर १४९ कोटींच्या खर्चाचे नियोजन आहे. मल्टिप्लेक्स मॉल, दुकान गाळे, कार्यालये १५ टक्के जागेवर उभारली जातील.
एमआयडीसीला जोडणार पर्यटनस्थळे
इंडस्ट्रीज आणि ऐतिहासिक स्थळे जोडण्यासाठी ६० किमीचा ३० फूट रस्ता उभारला जाणार आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सायकल ट्रॅक, फुटपाथ असतील. हा रस्ता वाळूज इंडस्ट्री ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंतची पर्यटनस्थळे इंडस्ट्रीजना जोडणारा असेल.
शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे पॅन सिटीत पर्यटन आणि सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी ३४७.९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रीन फील्डमध्ये अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या घरांच्या जागेत वाढ करण्यात आली. ९० टक्के घरे हिरव्या रंगाची असतील. या वेळी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, आयुक्त बकोरिया, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरिबांना घरासाठी अतिरिक्त जागा
महापालिकेतर्फे शनिवारी स्मार्ट सिटीवर सादरीकरण करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित मनपाचे पदाधिकारी अधिकारी.
ग्रीनफील्ड सिटी पूर्णपणे विकसित करण्यासाठी दहा वर्षांची योजना असून त्यासाठी १७३० कोटींचा खर्च होणार आहे. यातून १९३० कोटींची वसुली पालिकेला मिळेल. स्मार्ट सिटीच्या नावाने शासनाकडून ११३४ कोटींचा निधी असे एकूण ३११४ कोटी रुपये मिळतील. पैकी १७३० खर्चून १३८४ कोटींचा धनलाभ पालिकेला होईल, असेही सादरीकरणात चित्र मांडले गेले.
बातम्या आणखी आहेत...