आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयएमसाठी उद्योजक, व्यापारी रस्त्यावर उतरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नव्या भाजप सरकारने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेले आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) हे औरंगाबादेतच व्हावे यासाठी शहरातील उद्योजक, व्यापारी एकवटले आहेत. मसिआ, सीएमआयए, औरंगाबाद व्यापारी महासंघ, इंडस्ट्रियल सप्लायअर्स असोसिएशन यांच्यासह वेगवेगळ्या संघटनांनी रेल्वेस्थानक परिसरातील सीएमआयएच्या सभागृहात बैठक घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
आयआयएम औरंगाबादेतच व्हायला हवे, यासाठी संघटनांच्या वतीने जनजागृती करण्यात यावी, लोकप्रतिनिधींना घेराव घालण्यात यावा, साखळी उपोषण, महामोर्चा काढण्यात यावा, असे पर्याय ठेवण्यात आले होते. शेवटी क्रांती चौकात उपोषण निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांची परवानगी मिळेल त्यानुसार हे आंदोलन होणार असल्याचे डॉ. शरद अदवंत यांनी सांगितले. त्यापुढेही वेगवेगळी आंदोलने केली जातील, दीर्घकाळ आंदोलन चालवण्याची तयारी असल्याचे या वेळी ठरवण्यात आले.
आयआयएम हे औरंगाबादेत होईल, असे आशादायी चित्र प्रारंभी झाले होते; परंतु नंतर ते नागपुरात होणार असल्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसेच प्रयत्न चालवले असल्याचे समजल्यानंतर शहरातील या संघटनांचे प्रतिनिधी शुक्रवारी सायंकाळी एकत्र आले. सर्वांनी मिळून आंदोलन केल्याशिवाय ही संस्था औरंगाबादेत येणार नाही, यावर सर्वांचेच एकमत होते; परंतु नेमके आंदोलन काय करायचे यावर चर्चा झाल्यानंतर उपोषण निदर्शनांनी या आंदोलनाची सुरुवात करण्याचे ठरले. या बैठकीस मुनीश शर्मा, मुकुंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. शरद अदवंत, उल्हास शिऊरकर, आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ, मानसिंग पवार, अर्जुन गायके, अजय शहा, राजन हौजवाला, उमेश दाशरथी, विजय जैस्वाल, रितेश मिश्रा, राम मर्लापल्ले यांच्यासह मसिआ, सीएमआयए तसेच अन्य व्यापारी तसेच उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.